शास्ती कराला अभय योजना लागू करण्याचे श्रेय आ. खताळ यांचेच
संगमनेर शहरातील नागरिकांवर थकीत करांमुळे लादण्यात आलेली शास्ती माफ व्हावी, यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे सातत्याने पाठ पुरावा करत विधिमंडळात आवाज उठविला होता. त्यामुळेच संगमनेर सह संपूर्ण राज्यात शास्ती कराला अभय योजना लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याचे खरे श्रेय आमदार अमोल खताळ यांचेच आहे. मात्र या निर्णयाचे खोटे श्रेय पदवीधर आमदार घेत असल्याची टीका महा युतीच्या नेत्या पूनम दायमा यांनी केली.

संगमनेर शहरातील अनेक सामान्य नागरिक आर्थिक अडचणींमुळे माल मत्ता कर वेळेत भरू शकले नव्हते. परिणामी त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात शास्ती आकारण्यात आली होती. ‘अभय योजना’ अंमलबजावणीसाठी नगरपरिषद प्रशासनाला अडचणी येत होत्या. ३१ मार्च २०२५ अखेरची थकबाकी रक्कम वेबपोर्टलवरती उपलब्ध नसल्यामुळे नगरपरिषदेपुढे शास्ती माफीचा लाभ नागरिकांना देणे अवघड बनले होते. यासंदर्भात आमदार खताळ यांनी थेट उपमुख्य मंत्री आणि राज्याचे नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी दूरध्वनीद्वारे संवाद साधत नगरपरिषद प्रशासना समोरील अडीअडचणी, पोर्टलवर थकबाकीची अपूर्ण नोंद नागरिकांना वेळेत दिलासा न मिळाल्यास निर्माण होणाऱ्या परिस्थितीची माहिती आ. अमोल खताळ यांनी नगर विकास मंत्र्यांच्या निदर्शनास आणून देत सातत्याने पाठपुरावा केला.
राज्य शासनाने नवीन वर्षाची भेट म्हणून संपूर्ण राज्यामध्ये शास्ती कर माफीसाठी अभय योजना’ लागू केली आहे .या योजनेचा संगमनेरसह राज्यातील लाखो करदात्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. असे असताना या योजनेचे श्रेय घेण्यासाठी पदवीधर आमदार पुढे येत आहे मात्र याचे खरे श्रेय आ.अमोलखताळ यांनाच असल्याचे पुनम दायमा यांनी ठणकावून सांगितले.



