आमच्या चार पिढ्यांनी विधिमंडळाची प्रतिष्ठा जपली; राजकारणासाठी प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न’; संगमनेरच्या माजी नगराध्यक्ष अंजली तांबे यांचे आमदार अमोल खताळ यांना प्रत्युत्तर

  • ‘विधिमंडळ कालही पवित्र होते, आजही आहे आणि उद्याही राहील’

“मी भारतीय लोकशाहीचा मनापासून आदर करते. लोकशाहीचे पवित्र मंदिर असलेल्या विधिमंडळाबद्दल माझ्या मनात कालही नितांत आदर होता, आजही आहे आणि आयुष्यभर राहील,” अशा ठाम शब्दांत संगमनेरच्या माजी नगराध्यक्ष अंजली सुधीर तांबे यांनी त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप फेटाळून लावले. “चार पिढ्यांनी लोकशाही संस्थांचा सन्मान जपलेल्या आमच्या कुटुंबावर विधिमंडळाचा अवमान केल्याचा आरोप करणे अत्यंत वेदनादायी आणि दुर्दैवी आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

अंजली तांबे यांच्या एका डिजिटल माध्यमावरील वक्तव्याचा संदर्भ देत विधानसभा अधिवेशनात आमदार अमोल खताळ यांनी महाराष्ट्र विधानसभेचा अपवित्र विधानसभा असा उल्लेख केल्याचा आरोप करत, त्यांच्या विरोधात हक्कभंगाची कारवाई करण्याची मागणी केली. हे विधान संपूर्ण सभागृहाच्या प्रतिष्ठेवर आघात करणारे असल्याचे खताळ यांनी सभागृहात म्हटले होते. 

मात्र, या आरोपांना सडेतोड उत्तर देताना अंजली तांबे म्हणाल्या, “मी स्वतः लोकांनी निवडून दिलेली संगमनेरची नगराध्यक्षा म्हणून तब्बल साडेबारा वर्षे सभागृह चालवले आहे. सभागृहाची प्रतिष्ठा, मर्यादा आणि परंपरा जपण्याचे संस्कार माझ्यावर झाले आहेत.”

आपल्या कुटुंबाच्या लोकशाही परंपरेचा उल्लेख करत त्या म्हणाल्या, “मी स्वातंत्र्यसैनिक स्व. भाऊसाहेब थोरात यांची कन्या आहे. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला आणि महाराष्ट्र विधानसभेत सदस्य म्हणूनही काम केले. माझे बंधू बाळासाहेब थोरात यांनी चार दशकांहून अधिक काळ विधिमंडळात जनतेचा आवाज बुलंद केला. माझे पती डॉ. सुधीर तांबे यांनी १४ वर्षे विधानपरिषदेत काम केले आणि आज माझा मुलगा सत्यजीत तांबे विधिमंडळात जनतेचे प्रश्न मांडत आहे. अशा कुटुंबातील व्यक्ती विधिमंडळाचा अपमान करेल, असा आरोप करणे हे केवळ चुकीचेच नाही तर अत्यंत वेदनादायी आहे.”

“विरोध करा, टीका करा, विचारांची लढाई लढा; पण जाणीवपूर्वक चुकीचा अर्थ काढून एखाद्याची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करणे ही लोकशाहीची परंपरा नाही. माझ्या रक्तात लोकशाहीचा आदर आहे, माझ्या संस्कारात संसदीय सभागृहांचा सन्मान आहे. विधिमंडळ माझ्यासाठी कालही पवित्र होते, आजही पवित्र आहे आणि उद्याही पवित्रच राहील,” असे सांगत अंजली तांबे यांनी आरोपांना ठाम उत्तर दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *