संगमनेरला लवकरच उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, आमदार अमोल खताळ यांच्या पाठपुराव्याला यश

  • जे ४० वर्षांत झाले नाही ते १.५ वर्षात होणार

संगमनेर व अकोले तालुक्यातील नागरिकांची परिवहन विभागाशी संबंधित कामांसाठी वर्षानुवर्षे होणारी गैरसोय आता दूर होण्याच्या मार्गावर आहे. आमदार अमोल खताळ यांनी परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून, संगमनेर येथे लवकरच उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू होणार आहे. चाळीस वर्षांत जे शक्य झाले नाही, ते आमदार अमोल खताळ यांनी अवघ्या दीड वर्षात करून दाखवले आहे. मात्र, काहीजण या कामाचे खोटे श्रेय घेण्याचा प्रयत्न करत असल्याची टीकाही आमदार खताळ यांनी केली.

मंत्रालयातील बैठकीत सकारात्मक निर्णय

मुंबई येथील मंत्रालयात परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतीच महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत संगमनेर येथे उपप्रादेशिक परिवहन कार्यालय मंजूर करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. आमदार खताळ यांनी केलेला सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि संगमनेर व अकोले तालुक्यातील नागरिकांची गरज लक्षात घेऊन परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने आवश्यक कार्यवाही करून कार्यालय मंजुरीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.

लाखो नागरिकांना होणार दिलासा

सध्या संगमनेर व अकोले तालुक्यातील नागरिकांना वाहन नोंदणी, ड्रायव्हिंग लायसन्स, फिटनेस प्रमाणपत्र, वाहन परवाने (परमिट), वाहन मालकी हक्क हस्तांतरण तसेच इतर आरटीओच्या कामांसाठी अहिल्यानगर किंवा अन्य ठिकाणी जावे लागत होते. त्यामुळे वेळ, पैसा आणि श्रम वाया जात होते. उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू झाल्यानंतर ही सर्व कामे संगमनेरमध्येच होणार असल्याने दोन्ही तालुक्यांतील लाखो नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

वाढत्या गरजेमुळे कार्यालयाची आवश्यकता

तालुक्यातील वाढती लोकसंख्या आणि वाहनसंख्या लक्षात घेता उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची आवश्यकता अनेक वर्षांपासून होती. या मागणीसाठी सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करण्यात आला. आता हा प्रस्ताव अंतिम टप्प्यात पोहोचला असून, लवकरच त्याला अधिकृत मंजुरी मिळून कार्यालय कार्यान्वित होईल. त्यामुळे नागरिकांची प्रवासाची गैरसोय, प्रशासकीय अडचणी आणि अनावश्यक खर्च मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. मात्र, काहीजण फुकटचे श्रेय घेण्यात माहीर असून सोशल मीडियावर नौटंकी करण्यातच नेहमी अग्रेसर असतात, अशी टीकाही आमदार अमोल खताळ यांनी केली.

आमदार अमोल खताळ यांनी असा केला पाठपुरावा

  • २३ जानेवारी २०२५ : परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे पत्राद्वारे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची मागणी.
  • २० फेब्रुवारी २०२५ : राज्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (निरीक्षण) यांनी अहिल्यानगर प्रादेशिक परिवहन विभागाला सविस्तर अहवाल सादर करण्याचे पत्र दिले.
  • २१ मार्च २०२५ : या विषयावर सविस्तर आढावा बैठक घेण्यात आली.
  • २४ मार्च २०२५ : परिवहनमंत्री प्रताप सरनाईक व वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
  • ५ जून २०२५ : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे मागणी; त्यांनी परिवहनमंत्र्यांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.
  • २५ ऑगस्ट २०२५ : संगमनेर येथील आभार यात्रेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संगमनेरसाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सुरू करण्याचे आश्वासन देत परिवहन विभागाला आवश्यक त्या सूचना दिल्या.
  • १ जुलै २०२६ : परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी अधिकाऱ्यांकडून प्रस्तावाबाबत विचारणा करून नवीन धोरणानुसार मंजुरीबाबत सूचना दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *