विधानसभा सभागृहाबद्दल चुकीची वक्तव्य करणे अशोभनीय – घोरपडे

विधानसभेच्या अवमानाचा शिवसेना-महायुतीकडून निषेध

संगमनेर नगरपरिषदेच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेतील कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा आमदार अमोल खताळ यांनी पावसाळी अधिवेशनात उपस्थित केल्यानंतर त्यावरून सुरू झालेल्या वादात आता शिवसेना-महायुतीने उडी घेतली आहे. संगमनेर नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षांनी विधानसभेबाबत केलेल्या कथित अवमानकारक वक्तव्याचा शिर्डी लोकसभा शिवसेना-महायुती तसेच संगमनेर तालुका महायुतीच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला आहे. राज्याच्या सर्वोच्च असणाऱ्या विधानसभा सभागृहाबद्दल अशा प्रकारचे वक्तव्य करणे अशोभनीय असून, हा सभागृहाचा अवमान असल्याची टीका शिवसेनेचे जिल्हा संघटक व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य विठ्ठल घोरपडे यांनी केली आहे.


घोरपडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात आमदार अमोल खताळ यांनी संगमनेर विधान सभा मतदारसंघातील विविध लोकहिताच्या प्रश्नांची प्रभावीपणे मांडणी केली. शेतकऱ्यांचा पीकविमा, वीज पुरवठा,आरोग्य, शिक्षण, ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी आवश्यक निधी तसेच तालुक्याच्या सर्वांगीण विकासाशी संबंधित अनेक महत्त्वाचे विषय विधानसभेत उपस्थित करून त्यांनी राज्य सरकारचे लक्ष वेधले. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असल्याचेही त्यांनी नमूद केले.


संगमनेरकरांच्या विविध समस्या आणि अपेक्षा थेट राज्याच्या सर्वोच्च सभागृहापर्यंत पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण काम आमदार खताळ यांनी केले आहे. विशेषतः संगमनेर नगरपरिषदेच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेतील कथित भ्रष्टाचाराची उच्च स्तरीय चौकशी करण्याची मागणी विधानसभेत करून त्यांनी या गंभीर विषयाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष वेधले, असे घोरपडे यांनी म्हटले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या योजनेबाबत विविध स्तरांवर चर्चा सुरू असताना हा विषय थेट विधानसभेत मांडल्या मुळे तालुक्यातील नागरिकांच्या भावना व्यक्त झाल्या आहेत. गेल्या चार दशकांतील विकासकामांबाबत नागरिकांच्या मनात निर्माण झालेल्या प्रश्नांना न्याय मिळावा ही सर्वसामान्य जनतेची अपेक्षा होती.त्यानुसार लोक प्रतिनिधी म्हणून आमदार अमोल खताळ यांनी सर्वसामान्य जनतेच्या भावना विधानसभेत मांडल्याबद्दल शिवसेना-महायुतीच्या वतीने त्यांचे अभिनंदन व आभार व्यक्त करण्यात येत असल्याचेही घोरपडे यांनी पत्रकात म्हटले आहे.


विधानसभेसारख्या राज्याच्या सर्वोच्च असणाऱ्या सभागृहाबद्दल कोणत्याही जबाबदार व्यक्तीने अवमानकारक वक्तव्य करणे योग्य नसून, लोकशाही संस्थांचा सन्मान राखणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचेही विठ्ठल घोरपडे यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *