नेवासा फाट्यावर पत्रकार शंकर नाबदे यांना मारहाण, गुन्हा दाखल

२९ जुलै रोजी रात्री १० वाजता नेवासा फाटा येथे चंद्रकांत दरंदले यांच्या वृत्तपत्र विक्री व पान स्टॉलजवळ उभ्या असलेल्या पत्रकार शंकरराव नाबदे यांना दमदाटी करत अज्ञात व्यक्तीने मारहाण केली. भांडण सोडवण्यासाठी पुढे आलेल्या मराठा महासंघाचे जिल्हा सुकाणू समितीचे अध्यक्ष गणेश झगरे यांनाही जबर मारहाण करण्यात आली. याप्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


फिर्यादी शंकरराव नाबदे हे वडिलांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करून चंद्रकांत दरंदले व गणेश झगरे यांच्यासह चहा टपरीवर गप्पा मारत असताना एक ग्राहक सिगारेट घेऊन जात असताना नेवासा फाटा येथील एका व्यक्तीने त्याला अडवून “मला दोन सिगारेट पाजव” अशी दमबाजी करत त्याची दुचाकी पाडली व दादागिरी सुरू केली.


या प्रकारात हस्तक्षेप करत नाबदे यांनी त्यांचे भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर अचानक हल्ला झाला. नाबदे यांना वाचविण्यासाठी पुढे आलेल्या गणेश झगरे यांच्यावरही पाठीवर, डोक्यावर, कानावर आणि मांडी- पोटरीवर गंभीर मारहाण झाली. जखमी झगरे यांनी तत्काळ उपचार घेतले असून, आरोपी नेवासा फाटा परिसरातील असल्याचे समजते.
या घटनेचा नेवासा शहर प्रेस क्लब आणि तालुक्यातील पत्रकार संघटनांनी तीव्र निषेध केला आहे. गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनावर गुरुप्रसाद देशपांडे, नेवासा प्रेस क्लबचे अध्यक्ष मोहन अशोक डहाळे, सुधीर गायकवाड, चव्हाण, कैलास शिंदे, नाना पवार, सुहास पठाडे, शाम मापारी, मकरंद देशपांडे, पवन गरुड, रमेश शिंदे, शंकर नाबदे यांच्यासह मोहन गायकवाड, अनेक पत्रकारांच्या सह्या आहेत.

मंगळवारी घडलेली ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. युवकांमध्ये ‘भाईगिरी’ ची क्रेझ वाढतेय. अशा गुंड प्रवृत्तीच्या लोकांवर पोलीस विभागाने तात्काळ लगाम घालावा अशी मागणी केली जातीये. या गुन्ह्याचा पुढील तपास नेवासा पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *