- राजस्थान मंडळाचा अमृतमहोत्सव; श्रावणमासानिमित्त दोन दिवशीय अध्यात्मिक व्याख्यानमाला
समाजाच्या हितासाठी सोशल माध्यमांवर वेळीच नियंत्रण आणणे अत्यंत गरजेचे आहे. या माध्यमातून चांगल्या गोष्टींपेक्षा विकृतीचाच प्रचार मोठ्या प्रमाणात होत आहे. कुटुंबांना हानीकारक असलेल्या या माध्यमाचा समाजविघातक आणि राष्ट्रविघातक प्रवृत्तींकडूनही मोठ्या प्रमाणात गैरवापर होत असल्याचे वेळोवेळी समोर आले आहे. यासर्व गोष्टी थांबवण्यासाठी सोशल माध्यमावर निर्बंध लागू करुन नियमांच्या अधिन राहूनच त्याला परवानगी देण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन प्रसिद्ध कीर्तनकार पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी केले.

राजस्थान युवक मंडळाने आपल्या अमृत महोत्सवी स्थापना वर्षानिमित्ताने दोन दिवशीय अध्यात्मिक व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. त्याचे पहिले पुष्प गुंफताना पुरुषोत्तम महाराज पाटील बोलत होते. यावेळी मंचावर मंडळाचे अध्यक्ष मनीष मालपाणी, कार्याध्यक्ष सुमील अट्टल, उपाध्यक्ष सागर मनियार, सचिव कल्पेश मर्दा, खजिनदार प्रतीक पोफळे, कृष्णा आसावा व वेणुगोपाल लाहोटी आदी उपस्थित होते.
यावेळी पुरुषोत्तम महाराज पुढे म्हणाले की, या भूमीत जन्म घेणारी सगळी माणसं अत्यंत भाग्यशाली आहेत. या भूमीत ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरु तुकोबारायांचा जन्म झाला आहे. त्यांच्या पदस्पर्शाने, वास्तव्याने आणि उपदेशाने पवित्र झालेल्या भूमीत आपल्याला जन्म मिळाल्याचा प्रत्येकाला अभिमान असला पाहिजे. आपल्या सगळ्याच संतांनी डोळस भक्ती सांगितली आहे. पुराणात श्रावणमासाचे महात्म्य सांगितले गेले आहे. श्रावणमासातच ज्ञानेश्वर महाराज आणि भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव साजरा होतो. या सर्व अर्थाने श्रावणमासाला पुण्यपर्वाचा काळ म्हणूनही ओळखले जाते असे पुरुषोत्तम महाराज म्हणाले
तुकोबारायांच्या अभंगांचे आपल्या ओघवत्या आणि रसाळ वाणीतून निरुपण करतांना पुरुषोत्तम महाराजांनी भाविकांना अक्षरशः मंत्रमुग्ध केले. देशातील सध्याच्या स्थितीवर बोटं ठेवताना त्यांनी धर्माचे पालन करता आले नाही तरी निदान धर्माची टिंगल-टवाळी बंद करण्याचे आवाहन केले. आपणच आपल्या संस्कृतीची, धर्माची आणि व्रतवैकल्यांची थट्टा उडवू लागलोत तर आपल्यासारखे आपणच करंटे ठरु. हजारो वर्षांच्या परकीय गुलामगिरीतून बोध घेण्याची गरज व्यक्त करताना त्यांनी क्रूरकर्मा औरंगजेबाच्या अमानवीय अत्याचारानंतरही धर्माभिमान बाळगणार्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनचरित्राचा दाखला दिला.
पहेलगामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा उल्लेख करीत पुरुषोत्तम महाराज यांनी अतिरेक्यांनी 26 निष्पाप पर्यटकांना त्यांचा धर्म विचारुन गोळ्या घातल्या, जात विचारुन नव्हे असे ठणकावत जातीयवादाचा किडा मारुन टाकण्याचे आवाहनही केले. यावेळी त्यांनी सुखी जीवनासाठी परमार्थ करण्याचा सल्ला देताना सत्ता, संपत्ती, सौंदर्य यांच्या अहंकारापासून दूर राहण्याची अपेक्षाही व्यक्त केली.
मालपाणी परिवार धनसंपन्न असल्याने नाही तर, त्यांच्या ठायी दयाभाव असल्याने तो मोठा आहे. आध्यात्मिक, धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक क्षेत्रामध्ये या परिवाराने निरपेक्ष भावनेतून काम केले आहे. खरेतर त्याचा आदर्श घेवून राज्यातील अन्य औद्योगिक घराण्यांनी त्याचे अनुकरण करण्याची आवश्यकताही त्यांनी व्यक्त केली. आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पेश मर्दा यांनी केले. कृष्णा आसावा यांनी परिचय करुन दिला.



