संगमनेर नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांचा अखेर काढता पाय !

सुसंस्कृत, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम अशी ओळख असलेल्या संगमनेर तालुक्याला आजवर संपूर्ण महाराष्ट्रात वेगळी प्रतिष्ठा लाभली होती. येथे अधिकारी काम करण्यासाठी उत्सुक असत, हीच संगमनेरची खास ओळख होती. मात्र, काही महिन्यांपासून बदललेल्या राजकीय समीकरणांचा थेट परिणाम आता प्रशासकीय कामकाजावर होऊ लागला आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांना वेठीस धरले जात आहे, त्यांच्यावर मानसिक व आर्थिक दडपण आणले जात आहे, वेगवेगळ्या पद्धतींनी त्यांचे शोषण होत आहे. परिणामी, अनेक अधिकारी बदली मागत आहेत आणि संगमनेरातून काढता पाय घेत आहेत.

राज्यस्तरावर ओळख निर्माण केलेले व राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित झालेले मुख्याधिकारी रामदास कोकरे यांची संगमनेर नगरपरिषदेत काटेकोर शिस्त प्रस्थापित करण्यासाठी नियुक्ती झाली होती. मात्र त्यांनीही बदललेल्या परिस्थितीचा अंदाज घेऊन अखेर संगमनेर सोडले.

यापूर्वी तहसीलदारांनीही थेट तीन महिन्यांची रजा घेऊन संगमनेरातून पाय काढला होता. पालकमंत्र्यांच्या मध्यस्थीनेच ते पुन्हा कामावर रुजू झाले. तालुका पोलीस निरीक्षकांना पहिल्याच दिवशी स्थानिक लोकप्रतिनिधींनी “खरपूस समाचार” दिल्याने ते किती मनापासून काम करत असतील, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

आता तर उपविभागीय पोलीस अधिकारीदेखील बदलीच्या मार्गावर असल्याची चर्चा रंगली आहे. या घटनांमुळे सर्वात मोठी भीती आता खरी ठरू लागली आहे, संगमनेरात चांगले अधिकारी येणारच नाहीत!
राजकीय हस्तक्षेप, दबाव व चुकीची कामे करवून घेण्याची प्रवृत्ती बळावत असल्याने संगमनेरच्या “सुसंस्कृत ओळखीवर” प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

थोडक्यात, संगमनेरची जपलेली शैक्षणिक, सामाजिक आणि सुसंस्कृत परंपरा धोक्यात आली आहे. या बदलत्या वातावरणाला आळा घालण्यासाठी सुज्ञ नागरिकांनीच पुढाकार घेणे, ही वेळेची खरी गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *