- मूल्याधिष्ठित गुणवत्तापूर्ण शिक्षण, रुग्णसेवा आणि सामाजिक बांधिलकीचा संगम ठरला यशाचा पाया
एसएमबीटी सेवाभावी ट्रस्टचे एसएमबीटी मेडिकल सायन्सेस अण्ड रिसर्च सेंटर (SMBT IMSRC) या वैद्यकीय महाविद्यालयास राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद (नॅक)कडून ‘अ’ दर्जा (NAAC- A Grade) मानांकन प्राप्त झाले.नॅकने नुकतेच मूल्यांकन करून हे मानांकन बहाल केले. पहिल्याच फेरीत (First Cycle) अशा प्रकारचे मानांकन मिळविणाऱ्या देशातील मोजक्या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आता एसएमबीटी वैद्यकीय महाविद्यालयाची गणना होत आहे. या मानांकनामुळे महाराष्ट्रातील मूल्याधिष्ठित वैद्यकीय शिक्षण तसेच सर्वसामान्यांना परवडणारी गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा देणारी एक अग्रगण्य व विश्वसनीय संस्था म्हणून एसएमबीटी वैद्यकीय महाविद्यालय प्रभावीपणे अधोरेखित झाले आहे.

राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेच्या त्रिसदस्यीय समितीने दि. ८ व ९ ऑक्टोबर २०२५ रोजी इगतपुरी तालुक्यातील नंदी हिल्स येथील एसएमबीटी वैद्यकीय महाविद्यालयातील पायाभूत सेवा-सुविधांसह वैद्यकीय शिक्षण व विविध उपचार पद्धती यासाठी आवश्यक अत्याधुनिक उपकरणांची उपलब्धता, वैद्यकीय शिक्षण शाखेतील पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सर्वांगीण गुणवत्ता विकासासाठी केलेले कार्य, प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी केलेले विविध प्रकारचे संशोधन व नाविन्यपूर्ण उपक्रमांचा सखोल आढावा घेतला.
त्याचबरोबर मध्यवर्ती सुसज्ज् ग्रंथालय, स्वतंत्र डिजिटल लायब्ररी, शहरी व ग्रामीण भागातील वैद्यकीय उपचारासाठी कार्यरत पाच सॅटेलाईट सेंटर, जैविक कचरा व्यवस्थापन, विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज वसतीगृह व कर्मचा-यांसाठी निवास व्यवस्था, क्रिडांगण, पर्यावरणपुरक परिसरासाठी सौर उर्जा निर्मीती, जल पुनर्भरण प्रकल्प आणि महाविद्यालय स्तरावरील कार्यरत असलेल्या विविध समित्या, धोरणात्मक स्वरूपात कार्यप्रवण असलेली अंतर्गत गुणवत्ता मापक समिती यांसह इतर बाबींची सखोल गुणवत्ता तपासणी या समितीकडून करण्यात आली होती.
NAAC च्या तज्ज्ञ समितीने महाविद्यालयाच्या अभ्यासक्रमरचना, अध्यापन-अभिमूल्यन पद्धती, रुग्णालयातील क्लिनिकल मटेरिअल, महाविद्यालयात सुरू असलेले व पूर्ण झालेले वैद्यकीय संशोधनाचे प्रकल्प, विद्यार्थी सहाय्य व प्रगती, पायाभूत सुविधा, आयक्यूएसीची (IQAC) कार्यप्रणाली तसेच सामाजिक बांधिलकीचे उपक्रम यांचे सविस्तर मूल्यमापन केले. या सर्व निकषांमध्ये एसएमबीटी मेडिकल कॉलेजने अपेक्षित मानके पूर्ण केल्याची नोंद समितीने केली. त्यानंतर पुढील काही दिवसांत राष्ट्रीय मूल्यांकन आणि मानांकन परिषदेने एसएमबीटी वैद्यकीय महाविद्यालयास ‘ए’ ग्रेड मानांकन बहाल केले.
या मुल्यांकन प्रक्रियेसाठी एसएमबीटी सेवाभावी संस्थेचे व्यवस्थापकीय विश्वस्त तसेच सर्व पदाधिकाऱ्यांचे प्रोत्साहन आणि सहकार्य महत्त्वाचे ठरले. महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. मीनल मोहगांवकर, वैद्यकीय अधिक्षक डॉ. अंजली चितळे, उपअधिष्ठाता डॉ धनाजी जाधव, नॅक आयक्यूएसी (IQAC) समन्वयक डॉ. संदीप लांबे तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी यांच्या कठोर परिश्रमाचे हे फळ असल्याचे सांगत महाविद्यालयाच्या यशाबद्दल अभिनंदन केले जात आहे.
प्रत्येक घटक यशाचा भागीदार
या मानांकनामुळे शैक्षणिक व आरोग्य सेवा देण्याचे सातत्य टिकवून ठेवण्याची तसेच त्या अधिक उत्तम करण्याची जबाबदारी संस्थेला प्राप्त झाली आहे. हे यश व्यवस्थापनाच्या दूरदृष्टीचे, नियोजनपूर्वक राबवलेल्या शैक्षणिक सुधारणा, एनएबीएच मानकांशी सुसंगत रुग्णालय सेवा आणि प्राध्यापक–कर्मचारी–विद्यार्थी यांच्या एकत्रित प्रयत्नांचे फलित आहे. या मानांकनामुळे संस्थेची राष्ट्रीय पातळीवरील प्रतिमा अधिक भक्कम होईल, तसेच नवीन अभ्यासक्रम, संशोधन प्रकल्प तसेच संयुक्त संस्थात्मक उपक्रम यांना चालना मिळेल.
– डॉ. मीनल मोहगांवकर – अधिष्ठाता, एसएमबीटी आयएमएसआरसी
NAAC मानांकन हे पाच वर्षांसाठी वैध असते. या कालावधीत महाविद्यालयाने विद्यार्थी-केंद्रित व तंत्रज्ञानाधारित अध्यापन अधिक बळकट करणे, संशोधन प्रकाशनांची संख्या वाढवणे, तसेच ग्रामीण व वंचित रुग्णांना वैद्यकीय सेवा पुरवणाऱ्या कॅम्पस हॉस्पिटल मॉडेलला अधिक परिणामकारक बनवणे, अशी पुढील दिशा महाविद्यालयाने जाहीर केली आहे.
– डॉ. संदीप लांबे, आयक्यूएसी समन्वयक, एसएमबीटी आयएमएसआरसी


