- ट्रेंड असलेला तरुणाईचा आवडता कार्यक्रम फोक आख्यान संगमनेरमध्ये
- पारंपारिक लोककलांचा जागर, जय्यत तयारी सुरू
लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर मध्ये सातत्याने विविध दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होत असतात. थोर स्वातंत्र्यसेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात व हरितक्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवानिमित्त मंगळवार 11 नोव्हेंबर 2025 रोजी सायं. 6 वा. जाणता राजा मैदान येथे महाराष्ट्रातील तरुणांचा ट्रेंड असलेला फोक आख्यान हा लोकप्रिय कार्यक्रम सर्वांसाठी मोफत आयोजित करण्यात आले असल्याची माहिती कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांनी दिली आहे.

राज्यभरातील तरुणांच्या अत्यंत आवडीचा कार्यक्रम ठरलेल्या फोक आख्यानच्या आयोजनाबाबत अधिक माहिती देताना डॉ जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर मध्ये दरवर्षी राज्य व देश पातळीवरील अत्यंत दर्जेदार कार्यक्रमांचे आयोजन होते. सध्या महाराष्ट्रात सर्वात लोकप्रिय असलेला आणि तरुणांसाठी अत्यंत आवडीचा ठरलेला फोक अख्यान या कार्यक्रमाची सर्वत्र चर्चा आहे.
महाराष्ट्राची लोककला, समृद्ध संस्कृती आणि परंपरा नव्या पद्धतीने सांगण्याचा युवकांचा हा प्रयत्न महाराष्ट्रात अत्यंत लोकप्रिय ठरला आहे. हा कार्यक्रम मुंबई पुणे अशा मेट्रो शहरानंतर तालुका पातळीवर प्रथमच होत आहे. अहिल्या नगर जिल्ह्यात होणारा हा पहिला कार्यक्रम आहे.
एकविरा फाउंडेशन व आय लव संगमनेर चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने जाणता राजा मैदान येथे मंगळवार दिनांक 11 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 6 वा. हा कार्यक्रम होत असून यावेळी लोकनेते बाळासाहेब थोरात, मा आ. डॉ सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे यांच्यासह तालुक्यातील सर्व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
फोक आख्यान या कार्यक्रमात भारुड, गवळण, देवीचा जागर, खंडोबाची गाणी, महाराष्ट्राची लोककला, आदिवासी गाणी, पारंपारिक व जात्यावरची गाणी, पोवाडे, लावणी ,स्फूर्तीदायी गीते, असा पारंपारिक लोकगीतांचा अनमोल खजिना नव्या स्वरूपात मांडला जाणार आहे. 75 कलाकारांचा संच यामध्ये असून अनेक मराठी चित्रपट व विविध मालिकांमधील लोकप्रिय अभिनेते व अभिनेत्री यांचा समावेश आहे. या भव्य दिव्य कार्यक्रमाची जय्यत तयारी जाणता राजा मैदानावर सुरू असून सर्वांसाठी हा कार्यक्रम मोफत असणार आहे. युवकांनी आपले पास नोंदणीसाठी https://event.ekvirafoundation.com या साइटवर संपर्क करावा.
तरी या कार्यक्रमासाठी शहर व तालुक्यातील सर्व नागरिक, महिला व युवकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, एकविरा फाउंडेशन, व आय लव संगमनेर चळवळ यांच्या वतीने करण्यात आले आहे.



