“नगर जिल्ह्यातील राजकारणाचे जादूगार” काळाच्या पडद्याआड – आ. सत्यजित तांबेंनी आ. शिवाजी कर्डिलेंच्या निधनावर केला शोक व्यक्त

प्रस्थापित नसतानाही प्रस्थापितांच्या जिल्ह्यात स्वतःच्या एका वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने राजकारण करून मागील दोन दशकांहून अधिक काळ आपल्या कर्तृत्वातून एक वेगळाच दबदबा निर्माण करणारे मा. मंत्री, राहुरी विधानसभेचे आमदार व अहमदनगर (अहिल्यानगर) जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन मा. शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या निधनाची बातमी अत्यंत दुःखद आणि हादरवून टाकणारी आहे.

मागील काही दिवसांपासून पाठीच्या दुखापतीमुळे त्यांच्यावर उपचार सुरू होते. स्वतः पैलवान असलेले, सकारात्मक आणि नेहमी हसतमुख असलेले हे व्यक्तिमत्त्व कधीही स्वतःच्या आजारपणाची चिंता केली नाही. मात्र आज त्यांना अचानक आलेल्या हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं जाणं हे सर्वांसाठीच मोठं वैयक्तिक दुःख आहे.

माझ्या जिल्हा परिषदेच्या काळापासून त्यांनी दिलेलं मार्गदर्शन, विशेषतः जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या काळातील त्यांची रणनीती, विचारांची खोली आणि संघटनशक्ती अनुभवण्याचा मला योग आला. त्यामुळे राजकारणातील त्यांच्या अनुभवाचा आणि स्पष्ट भूमिकेचा माझ्या राजकीय प्रवासावर ठसा आहे.

कायम लोकांमध्ये राहणारे, थेट बोलणारे आणि कृतीशील असे ते व्यक्तिमत्त्व होते. पैलवान स्वभावाचा माणूस म्हणून राजकीय डावपेचातही त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. मी त्यांना नेहमीच म्हणायचो “हे नगर जिल्ह्यातील राजकारणाचे जादूगार आहेत” कारण राजकीय रणनिती घडवण्याचं आणि परिस्थिती आपल्या बाजूने वळवण्याचं एक अनोखं कौशल्य त्यांच्याकडे होतं.

या निमित्ताने मला अरुण काका जगताप यांची आठवण होते. राजकारण, समाजकारण आणि माणुसकी यामध्ये समरस झालेला दिलदार मनाचा माणूस. त्यांचंही असंच अकाली जाणं मला मोठा धक्का देऊन गेलं होतं, आणि आता कर्डिले साहेबांचं जाणंही तसंच अंतःकरण हलवून टाकणारं आहे.

परवाच सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडिओ पाहिला आणि मनात विचार आला की, यावर्षी पुन्हा त्यांच्या बुऱ्हाणनगर येथील दिवाळी फराळाच्या कार्यक्रमात त्यांना भेटायला मिळेल. पण आज ही दुःखद बातमी ऐकताना त्या आठवणी अधिकच मनाला चटका लावून गेल्या.

ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, आणि कर्डिले कुटुंबियांना या दुःखद प्रसंगातून सावरण्याचे बळ देवो.

  • आमदार सत्यजीत तांबे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *