अतिवृष्टीच्या तडाख्याने राज्यातील हजारो शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. शेतमाल, जनावरे, शेतीची साधनसामग्री सर्वच गोष्टी पाण्याखाली गेल्याने शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे. या दुःखद काळात शेतकऱ्यांना दिलासा देणारा हात पुढे केला आहे तो ओंकार ग्रुपने. ओंकार ग्रुपचे चेअरमन मा. श्री. बाबुराव बोत्रे पाटील, संचालिका सौ. रेखाताई बोत्रे पाटील, आणि संचालक ओमराजे बोत्रे पाटील यांनी मुख्यमंत्री सहायता निधीस तब्बल १ कोटी रुपयांचे योगदान देऊन शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या समस्येत मोलाची मदत केली आहे.

ही मदत रक्कम आज मुंबई येथे राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितदादा पवार, पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री मा. श्रीमती पंकजाताई मुंडे, आमदार मा. श्री. संभाजीराव पाटील निलंगेकर, मंत्री मा. श्री. दादा भुसे, व मा. श्रीमती यामिनी पाटील यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री सहायता निधीस सुपूर्द करण्यात आली.
या प्रसंगी बोलताना मा. श्री. बाबुराव बोत्रे पाटील म्हणाले “शेतकरी हा आपल्या देशाचा खरा कणा आहे. आज तो संकटात आहे, म्हणूनच समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी ओळखून आम्ही ही मदत देत आहोत. ओंकार ग्रुपचा प्रत्येक उपक्रम हा ग्रामीण विकास आणि शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठीच समर्पित आहे.”
ओंकार ग्रुपने यापूर्वीही शिक्षण, आरोग्य, रोजगारनिर्मिती आणि पायाभूत सुविधा विकास या क्षेत्रात अनेक सामाजिक प्रकल्प राबविले आहेत. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी दिलेला हा मदतीचा हात त्यांच्या सामाजिक संवेदनशीलतेचा आणि दानशूरतेचा अजून एक प्रेरणादायी दाखला आहे.
प्रतिनिधी – गणेश कविटकर



