पंचायतराज अभियानात ग्रामपंचायतींनी चांगले काम करून बक्षिसे मिळवावीत – आमदार अमोल खताळ यांचे आवाहन

संगमनेर – मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान हे संपूर्ण राज्यात पाच वर्षासाठी राबविले जाणार आहे, या अभियानामध्ये जी ग्राम पंचायत सर्वोत्कृष्ट काम करेल त्या ग्रामपंचायतीचा राज्य, विभागीय जिल्हा व तालुका पातळीवर गौरव होणार आहे, त्यामुळे तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने या अभियानामध्ये सहभाग घेऊन चांगले काम करून बक्षीस मिळवावे असे आवाहन आमदार अमोल खताळ यांनी केले.

महाराष्ट्र शासन ग्रामविकास व पंचायतराज विभाग जिल्हा परिषद अहिल्यानगर आणि  पंचायत समिती संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान कार्यशाळेचे उद्घाटन आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते झाले. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी दादासाहेब गुंजाळ ,गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे, सहाय्यक गट विकास अधिकारी राजेंद्र ठाकूर, कृषी अधिकारी वाळीबा उघडे, बालविकास प्रकल्पाधिकारी निलेश राऊत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता हेमंत चव्हाण, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. कुंडलिक येवले, आर पी आय शहराध्यक्ष कैलास कासार यांच्यासह पंचायत समितीचे अधिकारी उपस्थित होते.

आ.खताळ म्हणाले की, ग्रामपंचायतीने राजकारण हे फक्त निवडणुकां पुरतेच मर्यादित ठेवावे. निवडणुका संपल्या की राजकारण बाजूला ठेवून प्रत्येकाने एकमेकांच्या हातात हात घालून गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे. आपण निधी वाटपात कधीही भेदभाव केला नाही. केंद्रात आणि राज्यात आपल्या विचाराचे सरकार आहे. त्यामुळे निधीची अडचण येणार नाही परंतु एकमेकांनी हातात हात घालून गावाचा विकास केला तर गाव नक्कीच समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या जन्मदिवसाचे औचित्य साधत राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सुरू होणार आहे, या अभियानात प्रत्येक ग्रामपंचायतीने राजकीय गट-तट मतभेद बाजूला ठेवून सहभागी होऊन बक्षीस मिळवले तर संगमनेर तालुक्याचा निश्चितच संपूर्ण राज्यामध्ये गौरव होईल यासाठी ग्रामपंचायतीने या अभियानात चांगले काम करावे असा सल्ला आमदार खताळ यांनी दिला.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविण्यामागचा उद्देश संगमनेर पंचायत समितीचे गट विकास अधिकारी प्रवीण सिनारे यांनी आपल्या प्रस्ताविकातून मांडला. सूत्रसंचालन केंद्रप्रमुख बाळासाहेब जाधव व नंदकुमार राहणे यांनी केले तर आभार सहाय्यक गटविकास अधिकारी राजेंद्र ठाकूर यांनी मानले. यावेळी संगमनेर पंचायत समितीचे विस्तार अधिकारी विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामपंचायत अधिकारी आणि अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *