महाराष्ट्राच्या राजकारणात बाळासाहेब थोरातांचा दबदबा कायम !

  • महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळवण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस, उद्धव ठाकरे यांची भेट

काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी महसूलमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांचा राज्यातील सर्वच पक्षांमध्ये मोठा आदर असून, महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक व सहकार क्षेत्रात त्यांचा प्रभाव व दबदबा आजही कायम आहे, हे अलीकडील घडामोडींमधून स्पष्ट झाले आहे. नुकत्याच झालेल्या बैठकीत त्यांनी महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळावे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन महत्त्वपूर्ण चर्चा केली.

1985 पासून संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना ‘दुष्काळी तालुका ते विकसित तालुका’ असा संगमनेरचा प्रवास घडवून आणण्याचे ऐतिहासिक कार्य बाळासाहेब थोरात यांनी केले. विविध पायाभूत विकास योजनांद्वारे संगमनेरचा चेहरामोहरा बदलत त्यांनी संपूर्ण राज्यात एक आदर्श निर्माण केला.

माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकाळात नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गाचे सुसज्जीकरण, निळवंडे धरण व कालवा योजना, संगमनेर शहरासाठी थेट पाईपलाईन योजना, हायटेक बसस्थानक, पंचायत समिती, नगरपालिका, प्रांत कार्यालय, तहसील कार्यालय, शासकीय विश्रामगृह, भव्य क्रीडा संकुल अशा अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्पांची यशस्वी अंमलबजावणी झाली. संगमनेरच्या मानबिंदू असलेल्या कवी अनंत फंदी खुल्या नाट्यगृहाचे कामही अंतिम टप्प्यात असून, या प्रकल्पामुळे शहराच्या सांस्कृतिक क्षेत्रात नवा अध्याय लिहिला जाईल. संपूर्ण तालुक्यातील 171 गावे व 258 वाड्या याठिकाणी सातत्याने विकास योजना राबवत संगमनेरला ग्रामीण विकासाच्या आदर्श पातळीवर पोहोचविण्यात आले. तालुक्यातून दररोज सात लाख लिटर दूध उत्पादन, 13 लाख अंड्यांचे उत्पादन, तर फळबागा व कृषी क्षेत्रात संगमनेरने राज्यात आघाडी घेतली आहे. तसेच, गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे संगमनेर हे प्रमुख केंद्र म्हणून राज्यभर ओळखले जाते.

राज्यातील विरोधी पक्ष व काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वात बाळासाहेब थोरात यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीच्या पहिल्या 21 सदस्यांमध्ये थोरात यांचे स्थान आहे. त्यामुळे त्यांचा सन्मान केवळ राज्यापुरता मर्यादित नसून, राष्ट्रीय पातळीवरही महत्त्वपूर्ण आहे. महाविकास आघाडीला विधानसभा व विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपद मिळावे, यासाठी बाळासाहेब थोरात यांनी अलीकडेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधानसभा सभापती मिलिंद नार्वेकर व विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांची भेट घेतली. या चर्चेत विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार व उपनेते अमीन पटेल उपस्थित होते. या बैठकीला सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे समजते.

सातत्याने जनतेसाठी कार्यरत

फक्त निवडणुकीपुरते नाही, तर दररोज सकाळी सात वाजल्यापासून रात्री अकरा वाजेपर्यंत जनतेच्या सेवेसाठी तत्पर असणारे बाळासाहेब थोरात हे संगमनेर तालुक्यातील नागरिकांच्या मनात घर करून आहेत.वाडी-वस्त्यांवरील जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी ते सतत उपस्थित राहतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस पक्षाच्या विविध अभियानांचे महाराष्ट्रभर दौरे सुरू आहेत.

राज्याच्या राजकारणात थोरातांचा दबदबा कायम…

दररोज संगमनेर तालुका व जिल्ह्यातील नागरिक मोठ्या संख्येने त्यांच्या संपर्कासाठी येत असतात, हीच गोष्ट त्यांच्या कार्यपद्धतीचे व लोकप्रियतेचे द्योतक आहे. राज्यातील राजकीय घडामोडींमध्ये आणि विकासाच्या वाटचालीत बाळासाहेब थोरात यांचे वजन आजही कायम असून, त्यांच्या नेतृत्वाचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *