जयहिंद लोकचळवळीच्यावतीने शिवजयंतीनिमित्त भव्य आयोजन
संपूर्ण जगाचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गुरुवार दिनांक 19 फेब्रुवारी 2020 रोजी सायंकाळी 6 वा. कवी अनंत फंदी खुले नाट्यगृह येथे 40 कलावंतांच्या भव्य सादरीकरणात रायबा हेच का आपले स्वराज्य या महानाट्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आमदार सत्यजित तांबे यांनी दिली आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जयहिंद लोकचळवळीच्या वतीने गुरुवार दिनांक 19 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 6 वा. कवी अनंत फंदी खुलेनाट्यगृहामध्ये या भव्य महानाट्याचे आयोजन होणार आहे. यावेळी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात, मा. आ.डॉ. सुधीर तांबे, सौ दुर्गाताई तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, नगराध्यक्ष डॉ. मैथिलीताई तांबे, उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद शेख आदींसह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण जगाचे आराध्य दैवत आहे महाराजांचा जीवन कार्य हे पुढील पिढ्यांसाठी सदैव प्रेरणास्त्रोत असून रायबा हेच का आपलं स्वराज्य या महानाट्य मधून इतिहास व वर्तमान काळ यांची सांगड घातली जाणार आहे. प्राध्यापक प्रकाश वाघमारे लिखित आणि संगमनेरचे सुपुत्र डॉक्टर सागर फापाळे यांनी साकारलेल्या महाराजांच्या भूमिकेच्या या महानाट्याने संपूर्ण राज्यात लोकप्रियता मिळवली आहे 40 कलाकारांच्या संचामध्ये सध्याची ढासळलेली सामाजिक स्थिती, भ्रष्टाचार ,महिलांची असुरक्षितता ,बिघडलेली तरुण पिढी , व्यसनाधीनता,जातीयवाद अशा अनेक विषयांवर भाष्य केले जाणार आहे.
या महानाट्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, मा जिजाऊ साहेब, बाल शिवाजी, राज्याभिषेक सोहळा, मोगलांबरोबरचे विविध युद्ध ,मर्दानी खेळ, नेत्र दीपक फटाक्यांची आतिषबाजी आणि भव्य राज्याभिषेक हे वैशिष्ट्य ठरणार आहे.
हे महानाट्य सर्वांसाठी मोफत असणार असून संगमनेर शहर व तालुक्यातील नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवविचारांना अभिवादन करण्यासाठी व अंतर्मनाला साद घालणाऱ्या या नाटकासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन जयहिंद लोकचळवळीच्या वतीने करण्यात आले आहे.



