संगमनेरमध्ये स्त्री शक्तीचा जयघोष ! नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांच्यासह शेकडो महिलांनी ओढला हनुमानाचा रथ

हनुमान जयंती निमित्त संगमनेर शहरात पार पडलेल्या भव्य मिरवणुकीत नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्यासह शेकडो महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत हनुमानाचा रथ ओढण्याची परंपरा यंदाही मोठ्या उत्साहात जपली.

दरवर्षीप्रमाणे यंदाही सकाळी 8 वाजता शहर पोलीस स्टेशनपासून मिरवणुकीची सुरुवात झाली. पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी भगवा ध्वज हातात घेत जयघोषात मिरवणूक चंद्रशेखर चौकात आणली. येथे सजवलेल्या रथावर विधिवत भगवा ध्वज फडकवून पवनपुत्र हनुमानरायाची महाआरती करण्यात आली.

यानंतर शेकडो महिलांनी एकजुटीने रथाचा दोर हातात धरत चंद्रशेखर चौकातून रथ ओढला. चंद्रशेखर चौक, रंगार गल्ली, कॅप्टन लक्ष्मी चौक, लालबहादूर शास्त्री चौक, नगर पालिका, चावडी चौक, जुना कटारिया बाजारपेठ, तेलीखुंट, नेहरू चौक या मार्गाने मिरवणूक काढण्यात आली. अखेरीस मोठ्या मारुती मंदिराजवळ या सोहळ्याची सांगता झाली. मिरवणूक शांततेत आणि सुरळीत पार पडावी यासाठी पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

हा उत्सव यशस्वी करण्यासाठी श्रीराम नवमी व हनुमान जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सोमनाथ पराई, उपाध्यक्ष कमलाकर भालेकर, संगमनेरच्या माजी नगराध्यक्षा सौ.दुर्गाताई तांबेसह सर्व नवीन नगरसेविका व नगरसेवक यांसह राहुल नेहुलकर, निखिल पापडेजा, सौरभ उमर्जी, प्रथमेश गरुडकर, विनायक गरुडकर, शेखर सोसे, सुदर्शन दळे, प्रतीक नेवासकर, शोन थोरात, मयुर म्हसे, ओम भडांगे, शिवा भोंडवे, उमेश गोसावी, शुभम परदेशी, गोविंद नागरे, भरत वामन, शुभम जगधने, प्रसाद आळंदे आदींसह मान्यवर उपस्थित होते.

संगमनेरची ही परंपरा केवळ धार्मिक नसून स्त्रीशक्ती, धैर्य आणि एकजुटीचे प्रतीक आहे. हनुमान जयंतीनिमित्त महिलांनी मोठ्या श्रद्धेने आणि उत्साहाने रथ ओढण्याची परंपरा जपली आहे ही आपल्या संस्कृतीची अभिमानास्पद ओळख आहे.
महिलांचा वाढता सहभाग समाजात सकारात्मक परिवर्तन घडवणारा आहे. अशीच एकजूट आणि श्रद्धा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचत राहावी, हीच अपेक्षा.
(डॉ. मैथिली तांबे – नगराध्यक्षा, संगमनेर नगरपालिका)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *