- आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ यांचाही सहभाग
वनपुत्र हनुमान प्रभू श्रीरामचंद्र की जय चा जयघोष करत आमदार अमोल खताळ यांच्या पत्नी नीलम खताळ यांच्यासह उपस्थित शेकडो महिलांनी एकत्र येत हनुमानाचा रथ महिलांनी ओढण्याची परंपरा कायम जपली आहे.

हनुमान जयंतीनिमित्त दरवर्षाप्रमाणे याही वर्षी सकाळी८वाजता संगमनेर शहर पोलीस स्टेशनपासून पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी हातात भगवा ध्वज घेऊन वाजत-गाजत मिरवणुकीने चंद्रशेखर चौकात आणला आणि सजवलेल्या रथावर विधिवत भगवा ध्वज लावण्यात आला त्यानंतर आ. अमोल खताळ व पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या हस्ते पवनपुत्र हनुमानरायाची महाआरती करण्यात आली. त्यानंतर सौ नीलम खताळ माजी नगरसेविका श्रीमती शोभा परदेशी भाजप शहर आध्यक्ष पायल ताजणे रेखा गलांडे यांच्यासह शेकडो महिलांनी रथाचा दोर हातात धरून चंद्रशेखर चौका पर्यंत रथ ओढला. चंद्रशेखर चौका तून निघालेली रथाची मिरवणूक, रंगार गल्ली, कॅप्टन लक्ष्मी चौक, लालबहादूर शास्त्री चौक, नगरपालिका,चावडी चौक, जुना कटारिया बाजारपेठ, तेलीखुंट, नेहरू चौक या मार्गाने फिरून पुन्हा मोठ्या मारुती मंदिराजवळ या मिरवणुकीची सांगता झाली.
मिरवणूक शांततेत पार पाडण्या साठी पोलीस उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. हा उत्सव यशस्वी करण्यासाठी श्रीराम नवमी व हनुमान जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष सोमनाथ पराई, उपाध्यक्ष कमलाकर भालेकर, राजाभाऊ देशपांडे, वरद बागुल, चंद्रशेखर हिंदू मंडळाचे अध्यक्ष शुभम लाहामगे तसेच महिला शक्ती सदस्य देवयानी जोशी यांनी विशेष परिश्रम घेतले.
संगमनेरला महिलांनी हनुमान रथ ओढण्याची परंपरा ऐतिहासिक आहे ही परंपरा केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक परिवर्तनाचे प्रतीक आहे. आजच्या काळात महिला प्रत्येक क्षेत्रात पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून महिला पुढे जात आहेत,
हनुमान म्हणजे शक्ती, भक्ती आणि निष्ठेचे प्रतीक आहे. हनुमान रथ ओढण्याच्या परंपरेत सहभागी होताना महिलांमध्ये एक वेगळी ऊर्जा आणि आत्मविश्वास निर्माण होतो. ही परंपरा महिलांच्या सक्षमीकरणाचा संदेश देणारी असून समाजामध्ये समानतेची भावना अधिक दृढ करणारी आहे.
(नीलम खताळ – सामाजिक कार्यकर्त्या)



