ऊस शेतीत एआय तंत्रज्ञानाचा अवलंब करा; कमी खर्चात जास्त उत्पादन – चेअरमन राजेंद्र नागवडे

ऊस शेतीमध्ये कमी खर्चात व कमी क्षेत्रात जास्त उत्पन्न काढणे करिता नवीन ए आय तंत्रज्ञानाचा वापर करणे काळाची गरज निर्माण झालेली असून त्याकरिता जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन राजेंद्रदादा नागवडे यांनी केले आहे. 

           प्रसिद्धी पत्रकात नागवडे यांनी पुढे म्हटले आहे की, दिवसेंदिवस वाढत असलेल्या खतांच्या, औषधांच्या व बि- बियाणांच्या किमती तसेच वाढती मजुरी यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना यापुढे पारंपारिक पद्धतीने शेती करणे परवडणारे नाही. त्याकरिता नव्याने आलेल्या ए आय तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून आधुनिक पद्धतीने शेती करणे अनिवार्य झालेले आहे. ऊस उत्पादकता वाढविण्यासाठी वसंत दादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी, एडीटी बारामती व साखर संघ मुंबई यांचे संयुक्त विद्यमाने योजना राबविली जात आहे. या योजनेत कारखान्याचा सभासद असलेला शेतकरी सहभाग घेऊ शकतो‌. त्यासाठी ऊस पिकात ठिबक सिंचन आवश्यक असून व्हीएसआय पुणे किंवा पाढेगाव संशोधन केंद्राने प्रमाणित केलेल्या एक डोळा ऊस रोपांची लागवड करणे आवश्यक आहे. 2.5 एकर पूर्व हंगामी व सुरू ऊस लागवड केलेल्या शेतकऱ्यास या योजनेत सहभाग घेता येईल‌. सदर उसामध्ये अन्य कोणतेही आंतरपीक घेता येणार नाही. सदर योजनेमध्ये सहभागी होणारे शेतकरी हे पाच कि.मी. व्यासाच्या परिघात असणे आवश्यक आहे. म्हणजे त्यांना स्वयंचलित हवामान केंद्राद्वारे व सेंसरद्वारे आवश्यक ती माहिती उपलब्ध होऊ शकेल‌ तसेच प्रत्येक क्लस्टर मध्ये कमीत कमी 25 शेतकऱ्यांचा ‌एक गट सहभागी होणेआवश्यक आहे. 

        नागवडे यांनी पुढे म्हटले आहे की, या तंत्रज्ञानाकरिता प्रति हेक्‍टरी रुपये 25 हजार खर्च येणार आहे‌ ‌. त्यापैकी 15 हजार रुपये पुढील पाच वर्षाकरिता लागणाऱ्या उपकरणांकरिता असून रुपये दहा हजार ए आय नोंदणी व सेवा सल्ला शुल्क म्हणून प्रतिवर्षी खर्च येणार आहे. तथापि या योजनेत सहभाग घेणाऱ्या पहिल्या पाच हजार शेतकऱ्यांना 0 रुपये खर्च असून त्यांना व्हीएसआय मार्फत 18,250 रुपये तर कारखान्यामार्फत रुपये 6750 कर्जरुपाने बिगर व्याजी ही रक्कम उपलब्ध करून दिली जाणार आहे. 

         नागवडे कारखान्याच्या जास्तीत जास्त सभासद शेतकऱ्यांनी आपली ऊस उत्पादकता वाढविण्याकरिता या योजनेचा लाभ घ्यावा व त्याकरिता कारखान्याचे शेतकी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून आपली नाव नोंदणी करावी असे आवाहन राजेंद्र दादा नागवडे यांनी केले आहे.

प्रतिनिधी – गणेश कविटकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *