नाशिक-पुणे प्रस्तावित रेल्वेमार्ग संगमनेर, अकोले तालुक्यातील मूळ मार्गाने नेण्याच्या दृष्टीने रेल्वे विभागाने अन्य पर्यायी मार्गाचा सकारात्मकतेने विचार करण्याच्या जलसंपदा राधाकृष्ण विखे पाटील यांची सूचना

नाशिक-पुणे प्रस्तावित रेल्वेमार्ग संगमनेर, अकोले तालुक्यातील मूळ मार्गाने नेण्याच्या दृष्टीने रेल्वे विभागाने अन्य पर्यायी मार्गाचा सकारात्मकतेने विचार करण्याच्या सूचना जलसंपदा तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या.

पुणे नासिक प्रस्तावित रेल्वे मार्गाच्या संदर्भात मंत्री विखे पाटील यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांची भेट घेतली होती.मंत्री वैष्णव यांनी अधिकार्याना केलेल्या सूचनेनूसार मंत्रालयात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.बैठकीला आ.अमोल खताळ यांच्यासह रेल्वे विभागाचे राजेश कुमार शर्मा प्रशासकीय अधिकारी भुनेश्वर कुमार मुख्य अधिकारी विजय कुमार राय यांच्यासह विकास क्रांती सेना रेल्वे कृती समितीचे किशोर डोके भगवान काळे सतिष फापाळे जालिंदर गागरे संतोष शेळके यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत रेल्वे विभागाने प्रकल्प आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले.प्रस्तावित मार्गामध्ये झालेल्या बदलानंतर संगमनेर अकोले तालुक्यातील नागरीकांमध्ये मोठ्या प्रमाणात तीव्र संताप व्यक्त करण्यात आल्याची बाब मंत्री विखे पाटील यांनी रेल्वे अधिकार्यांच्या निदर्शनास आणून दिले.बदल करताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेतले नसल्याची बाब गांभिर्याने मांडण्यात आली.

लोकांची मागणी लक्षात घेवून जीएमआरटीला अडचण होणार नाही असा पर्यायी मार्ग निर्माण करण्यासाठी रेल्वे विभागाने सकारात्मकतेने विचार करण्याच्या सूचना मंत्री विखे पाटील यांनी दिल्या.याबाबत रेल्वे विभाग सकारात्मक भूमिका घेवून नव्याने पुन्हा संरेखन करण्याबाबत विचार करीत असल्याचे अधिकार्यांनी आश्वस्त केले.

मूळ मार्गात ज्या गावांचा समावेश होता त्या गावात आ.अमोल खताळ यांच्या समवेत प्रत्यक्ष जावून रेल्वे विभागाने पाहाणी करण्याचे मंत्री विखे पाटील यांनी सूचित केले.पुणे नासिक रेल्वे मार्गाच्या प्रश्नाबाबत मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत संगमनेर अकोले तालुक्याला न्याय मिळेल आशी भूमिका मांडण्यात आली असून,अंतिम निर्णय होण्याकरीता लवकरच केंद्रीय रेल्वे मंत्री आश्विनी वैष्णव यांची भेट घेणार असल्याचे आ.अमोल खताळ यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *