संगमनेरच्या आरोग्य समस्यांवर सरकारचे लक्ष वेधले, नर्सिंग कॉलेजला मंजुरी द्यावी – आमदार अमोल खताळ

मुंबई येथे सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात संगमनेर मतदारसंघातील नागरिकांना भेडसावणाऱ्या आरोग्यविषयक समस्यांकडे आमदार अमोल खताळ यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. मतदारसंघातील रुग्णालयांमध्ये आवश्यक वैद्यकीय उपकरणांचा अभाव, औषधांचा अपुरा पुरवठा तसेच डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर रिक्त जागा असल्याने रुग्णांना वेळेवर आणि दर्जेदार उपचार मिळण्यात अडचणी येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी बोलताना आमदार खताळ म्हणाले की, संगमनेर मतदारसंघ भौगोलिकदृष्ट्या विस्तीर्ण असल्यामुळे येथील नागरिकांना आरोग्य सेवांसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक वेळा गंभीर रुग्णांना उपचारांसाठी दूरच्या शहरांमध्ये जावे लागते, ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. त्यामुळे स्थानिक स्तरावरच सक्षम आणि सुसज्ज आरोग्य व्यवस्था उभी राहणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. रुग्णालयांमध्ये आधुनिक वैद्यकीय उपकरणांची उपलब्धता, औषधांचा पुरेसा साठा आणि प्रशिक्षित डॉक्टर तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांची नियुक्ती यावर शासनाने विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. औषधांची गुणवत्ता, त्यांची किंमत आणि उपलब्धता यावर प्रभावी नियंत्रण ठेवले गेले पाहिजे.

तसेच संगमनेर मतदारसंघात प्रशिक्षित वैद्यकीय मनुष्यबळाची कमतरता लक्षात घेता संगमनेर येथे नर्सिंग कॉलेज सुरू करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आलेला असून या प्रस्तावास तातडीने मंजुरी देऊन नर्सिंग शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिल्यास भविष्यात स्थानिक स्तरावर प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी तयार होतील आणि आरोग्य व्यवस्थेला मोठा आधार मिळेल, संगमनेर मतदारसंघातील नागरिकांना दर्जेदार आणि वेळेवर आरोग्य सेवा उपलब्ध व्हाव्यात यासाठी शासनाने ठोस आणि तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आमदार अमोल खताळ यांनी सभागृहात केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *