- – तळेगाव पाणीपुरवठा विस्कळीत होण्यास विखे-खताळच कारणीभूत
- – नाकर्तेपणा झाकण्यासाठी सत्ताधाऱ्यांची स्टंटबाजी; काँग्रेसचा आरोप
तळेगावसह १६ गावांच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेवरून संगमनेरमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. “गेल्या वर्षभरापासून ही योजना बंद पडलेली असताना पालकमंत्री आणि नवीन लोकप्रतिनिधींनी तिकडे ढुंकूनही पाहिले नाही. या दुर्लक्षामुळे योजनेत विस्कळीतपणा आला आहे. त्यामुळे ही प्रादेशिक पाणीपुरवठा योजना बंद व्हायला पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार अमोल खताळच जबाबदार आहेत. आता निवडणुका जवळ आल्यावर आणि जनतेने जाब विचारायला सुरुवात केल्यावर यांना योजना आठवली आहे.” अशी बोचरी टीका काँग्रेस पदाधिकारी सचिन दिघे यांनी केली आहे.

सचिन दिघे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात सत्ताधाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार ताशेरे ओढले आहेत. ते म्हणाले की, ही योजना लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी मंजूर करून अत्यंत कष्टाने सुरू ठेवली होती. गेली २५ ते ३० वर्षे ही योजना कार्यरत असून १६ गावांची तहान भागवण्याचे काम या योजनेने केले आहे. अनेक अडचणी आल्या, मात्र लोकप्रतिनिधी म्हणून बाळासाहेब थोरात यांनी प्रत्येक अडचणीतून मार्ग काढला. वीजबिलाचे प्रश्न यापूर्वीही उपस्थित झाले होते, मात्र बाळासाहेब थोरात यांनी स्वतः लक्ष घालून त्यावर तोडगा काढला.
आता नव्याने झालेल्या आमदारांना मुळात ही योजना कशी आली आहे, कोणत्या मार्गे आली आहे, हे सुद्धा माहित नाही. गेल्या वर्षभरापासून या योजनेवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पगार थकलेले आहेत. कोल्हेवाडीत सन्माननीय पालकमंत्री विखे पाटील साहेब यांच्या कार्यकर्त्याच्या शेतात ही योजना लिक झाली आहे, मात्र ते लिकेज काढण्यासाठीही तिथे विरोध होत आहे. वडगाव पान येथील तलावावर आमदारांनी एकदा तरी जाण्याची तसदी घेतली आहे का? प्रवरेचे पाणी देवकवठेसारख्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचवण्याचे काम थोरातांनी केले. वीजबिल असो वा पाईपलाईनची गळती, थोरात कारखान्याच्या यंत्रणेने पदरमोड करून ही योजना नेहमीच कार्यान्वित ठेवली, मात्र नवीन आमदारांना किंवा पालक मंत्र्यांना या योजनेशी काहीही देणे घेणे नाही.
त्यामुळे पालकमंत्री महोदय सुज्ञ आहेत. त्यांनी टीका करताना किंवा आरोप करताना केवळ आमदारांनी सांगितले म्हणून बोलू नये. या योजनेच्या बाबतीतील सत्यस्थिती समजून घ्यावी. एकदा आमदार महोदयांनाही जाब विचारावा की तुम्ही किती वेळा या योजनेची पाहणी करायला गेलात? गावातील नागरिकांनी अनेक वेळा या संदर्भात शासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. त्यावर शासकीय अधिकारी म्हणतात, “आम्ही आत्ताच बदली होऊन आलो आहोत, आम्हाला या योजनेबद्दल काहीच माहिती नाही.”
“ऑक्टोबर २०२४ पासून ही योजना बंद आहे. तिचे लाईटबिल थकले आहे. मग गेल्या वर्षभरात ही योजना सुरू करण्यापासून तुमचे हात कोणी बांधले होते का?” असा सवाल दिघे यांनी उपस्थित केला आहे. केवळ प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी करणाऱ्यांना या योजनेतील गावांची नावेही नीट माहिती नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली.
निळवंडे धरण, कालवे आणि भोजापूर चारीसाठी बाळासाहेब थोरातांनी आयुष्य झिजवले आहे. आज जे उद्घाटन करून श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांनीच निळवंडे धरणाला आणि भोजापूर चारीला विरोध केला होता, हे विसरून चालणार नाही. ज्यांना या चारीचा पत्ताही नव्हता, ते आज ‘विकासपुरुष’ असल्याचा आव आणत फिरत आहेत. मात्र जनतेला सत्य माहिती आहे. तुम्ही कितीही चमकोगिरी केली तरी लोकांचा विश्वास संपादन करू शकणार नाही, असेही दिघे यांनी ठणकावून सांगितले.
ही राजकीय स्टंटबाजी
“मागील दीड वर्षापासून योजना बंद असताना पालकमंत्री आणि विद्यमान लोकप्रतिनिधी गप्प का होते? लोकांना वर्षभरातच तुमचा खरा चेहरा कळला आहे. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर स्टंटबाजी करून तुम्ही स्वतःचे अपयश झाकण्याचा प्रयत्न करत आहात,” असे सचिन दिघे यांनी स्पष्ट केले.
पालकमंत्र्यांनी आमदारांना जाब विचारावा!
“पालकमंत्र्यांनी कमिटी बरखास्त केली, मात्र खरेतर त्यांनी आमदारांना विचारावे की, ते किती वेळा योजनेची पाहणी करायला गेले? वीज मंडळाशी त्यांनी कधी संवाद साधला का? कर्मचाऱ्यांच्या थकीत पगारा बाबत काय कार्यवाही केली? आमदारांच्या कामाचा आढावा घेतला तर पालकमंत्र्यांना सत्य कळेल आणि मग कुणाला बरखास्त करायचे याची जाणीव होईल,” असा टोला दिघे यांनी लगावला.



