साखर उद्योगात अल्पावधीतच उल्लेखनीय प्रगती साधणाऱ्या ओंकार शुगर ग्रुपला नवभारत समूहातर्फे देण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘बिझनेस एक्सलन्स अवॉर्ड २०२५’ जाहीर झाला आहे. मुंबईतील ताज हॉटेल येथे आयोजित भव्य सोहळ्यात परिवहन मंत्री प्रतापसिंह नाईक आणि मत्स्य व बंदर मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते हा सन्मान ओंकार शुगर ग्रुपचे संचालक ओमराजे बोत्रेपाटील यांनी स्वीकारला.

या यशामागे समूहाचे संस्थापक बाबुराव बोत्रेपाटील यांचे दूरदृष्टीपूर्ण नेतृत्व आणि उद्योगविश्वातील खडतर संघर्षाचा ठसा स्पष्ट दिसतो. प्रारंभीच्या अडचणींवर मात करून त्यांनी साखर उद्योगावर विशेष लक्ष केंद्रित केले. सातत्यपूर्ण परिश्रम, नावीन्यपूर्ण उपक्रम आणि शेतकरीहिताचा विचार या तत्त्वांवर आधारित कार्यपद्धतीमुळे ओंकार शुगर ग्रुप आज उद्योगक्षेत्रात वेगाने पुढे सरसावत आहे.
साखर उत्पादन, सहकारी भागीदारी, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा, तसेच स्थानिकांना रोजगारनिर्मिती या माध्यमातून ग्रुपने ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी हातभार लावला आहे. त्याचबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब आणि शाश्वत उद्योगव्यवस्थेची उभारणी यामुळे ओंकार शुगर ग्रुपला राष्ट्रीय स्तरावर विविध संस्थांकडून गौरव मिळत आहे.कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी ओंकार शुगर ग्रुपच्या कार्याचे कौतुक करताना भविष्यातील मोठ्या यशस्वी प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
(प्रतिनिधी – गणेश कविटकर)



