संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथे कीर्तनादरम्यान झालेल्या गदारोळानंतर कीर्तनकार संग्राम बापू भंडारे यांच्या गाडीची तोडफोड झाल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. या घटनेने स्थानिक तसेच राज्याच्या राजकीय वातावरणा सोबत वारकरी संप्रदायातही खळबळ उडाली होती. मात्र आता पोलिसांच्या तपासातून या प्रकरणाचे सत्य समोर आले असून, भंडारे यांच्या गाडीवर कोणतीही तोडफोड झाली नसल्याच पोलीस तपासात समोर आला आहे.

गेल्या आठवड्यात घुलेवाडी गावातील किर्तनादरम्यान झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर संग्राम भंडारे यांच्या गाडीची तोडफोड झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या आरोपाने राजकीय चर्चेला उधाण आले होते. यावर काँग्रेस नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सभेतच सीसीटीव्ही फुटेज सादर करून हे आरोप खोटे असल्याचे सांगितले होते. फुटेजमध्ये गाडी कुठेही फोडलेली किंवा नुकसान झालेली नसल्याचे स्पष्ट दिसत होते.
यानंतर पोलिसांनी स्वतंत्र चौकशी सुरू केली. शुक्रवार २२ ऑगस्ट २०२५ संगमनेर शहर पोलिसांनी हिवरगाव पावसा व चाळकवाडी टोलनाक्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तपासात एम एच १४ जी एस २८५६ क्रमांकाची गाडी १०, ११ आणि १७ ऑगस्ट रोजी जशीच्या तशीच असल्याचे उघड झाले. वाहनावर तोडफोड झाल्याचे कोणतेही पुरावे मिळाले नाहीत.या निष्कर्षामुळे भंडारे यांच्या गाडीवर तोडफोड झाल्याचा दावा फोल ठरला आहे. या संपूर्ण प्रकरणाचा राजकीय हेतू होता का, यावर आता चर्चा रंगू लागली आहे. पुढील काळात पोलिसांची कारवाई आणि या तपासाला मिळणारे नवे वळण याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



