म्हाळुंगी पुलाच्या वादावरून आमदार सत्यजीत तांबे आक्रमक; शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी यांना कायदेशीर नोटीस

  •  दहा कोटी रुपयांच्या अब्रूनुकसानीचा दावा दाखल करणार
  • चार दिवसात सिद्ध करा, अन्यथा कायदेशीर कारवाई करणार

म्हाळुंगी पुलाच्या कामात अडथळा आणल्याचा आरोप झाल्यानंतर आमदार सत्यजीत तांबे यांनी शिवसेना (शिंदे गट) शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी यांना थेट कायदेशीर नोटीस पाठवली आहे. १५ नोव्हेंबर रोजी प्रकाशित बातमीत सूर्यवंशी यांनी “काँग्रेस पुरस्कृत आमदाराने म्हाळुंगी पुलाचे काम रखडवले” असा उल्लेख केला होता. चार दिवसात आरोप सिद्ध करा अन्यथा कायदेशीर कारवाई करणार असाही इशारा तांबे यांनी दिला आहे.

या विधानाला आमदार तांबे यांनी “पूर्णपणे खोटा आणि दिशाभूल करणारा आरोप” असे म्हणत कायदेशीर कारवाईचा मार्ग अवलंबला आहे. सूर्यवंशी यांना अ‍ॅड. अमोल कारभारी घुले यांच्या मार्फत कायदेशीर नोटीस देण्यात आली आहे.

नोटीसमध्ये म्हटले आहे की, म्हाळुंगी पुलासाठी लागणारा मूळ तसेच संपूर्ण निधी तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनीच मंजूर केला असून शिवसेना किंवा त्यांच्या नेत्यांनी या कामासाठी निधी उपलब्ध करून दिलेला नाही. नाटकी नाल्याच्या सुशोभीकरणासाठी मंजूर झालेला निधी नगरपालिकेने पुढे व्यावसायिक संकुलाकडे वळवला आणि नंतर पुन्हा तोच निधी वळवून म्हाळुंगी पुलाचे काम सुरू करण्यात आल्याची माहितीही नोटीसमध्ये देण्यात आली आहे. त्यामुळे तांबे यांच्यावर पुलाचे काम रखडवण्याचा आरोप करण्यास कोणताही आधार नसल्याचा ठपका नोटीसमध्ये ठेवण्यात आला आहे.

“मी अपक्ष आहे; राजकीय हेतूने आरोप” – तांबे यांची भूमिका

तांबे यांनी नोटीसमार्फत स्पष्ट केले आहे की ते पूर्णपणे अपक्ष म्हणून निवडून आलेले असून त्यांनी विधानपरिषदेत भारतीय जनता पक्ष, काँग्रेस किंवा कोणत्याही राजकीय पक्षाचे सहयोगी सदस्यत्व स्वीकारलेले नाही. याउलट आरोप करणाऱ्यांचे ज्येष्ठ नेते कधी मला भाजपचे असल्याचे म्हणतात तर कधी काँग्रेसचे; ही विधाने गोंधळलेल्या अवस्थेत आणि अज्ञानाने केलेली असून यातून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे.

खोटी माहिती पसरवल्याचा आरोप

नोटीसमध्ये सूर्यवंशी यांच्या या विधानांमुळे आमदार तांबे यांची सार्वजनिक प्रतिमा खराब होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे कायद्यांचे उल्लंघन झाल्याचा दावा करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता – कलम ३५२, ३५३, २०६ अन्वये तसेच महाराष्ट्र नागरी सेवा (आचार) नियम १२३ व माहिती तंत्रज्ञान कायदा, कलम ६६(D) या सर्व तरतुदींनुसार सूर्यवंशी यांच्या विरोधात दहा कोटी रुपयांच्या अब्रूनुकसानीचा दावा दाखल करण्याचा तसेच गुन्हा नोंदविण्याचा इशारा देण्यात आला आहे.

चार दिवसांची मुदत; अन्यथा कायदेशीर कारवाई करणार

नोटीसमध्ये सूर्यवंशी यांनी चार दिवसांच्या आत दोन लायक साक्षीदारांच्या उपस्थितीत लेखी माफी मागावी तसेच त्याला वृत्तपत्रे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्धी द्यावी असे सांगण्यात आले आहे. या सर्व बाबी विहित मुदतीत न केल्यास कायदेशीर पर्याय अवलंबणार असल्याचेही नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

स्थानिक राजकारणात खळबळ

आमदार तांबे यांच्या या कारवाईनंतर संगमनेरच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. म्हाळुंगी पुलाच्या कामावरून सुरू झालेला वाद आता कायदेशीर टप्प्यावर पोहोचल्यानं दोन्ही गटांत तणाव वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यापुढे हा वाद किती भडकतो आणि माफी येते की थेट न्यायालयीन संघर्ष, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *