- संगमनेरची बंधुभाव, विकासाची, आनंदाची संस्कृती टिकवण्यासाठी कटिबद्ध रहा
- संगमनेरचे वातावरण खराब करण्याचा काहींचा प्रयत्न
- संगमनेर मधील कार्यकर्त्यांशी साधला संवाद
1985 ते आतापर्यंत संगमनेर शहर हे अत्यंत सुरळीत चालले. विकासाच्या अनेक योजना राबवल्या गेल्या. शांतता, बंधुभाव, सुव्यवस्था आणि आनंदाचे वातावरण हे संगमनेरचे वैशिष्ट्य राहिले असून ही संस्कृती आपल्याला टिकवायची आहे. मात्र मागील काही काळामध्ये दहशत गुंडगिरी वाढत चालली असून काही मंडळी शहराचे वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत आहे. अशा शक्तींना आपल्याला एकत्रित होऊन रोखायचे आहे.जनता आपल्या सोबत असून येणाऱ्या आगामी नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांमध्ये विजय आपलाच होणार असून सर्व कार्यकर्त्यांनी अधिक जोमाने काम करा असे आवाहन काँग्रेसच्या राष्ट्रीय कमिटीचे सदस्य तथा मा. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.


सुदर्शन निवासस्थानी संगमनेर मधील विविध कार्यकर्त्यांशी संवाद साधताना ते बोलत होते यावेळी मा
आमदार डॉ सुधीर तांबे, नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे, दिलीपराव पुंड, विश्वासराव मुर्तडक, सोमेश्वर दिवटे, इसाक खान पठाण, अरुण वाकचौरे सोमेश्वर दिवटे, डॉ.जयश्रीताई थोरात निखिल पापडेजा, किशोर पवार, यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, 1991 मध्ये डॉ सुधीर तांबे हे नगराध्यक्ष झाले आणि तेव्हापासून संगमनेर शहर हे अत्यंत काळजीपूर्वक आणि सुंदर सांभाळले. एकही आरोप कधी झाला नाही. प्रत्येक नगराध्यक्षांनी त्यांच्या कार्यकाळात अत्यंत चांगले काम केले. सौ दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वात नगरपरिषदेने स्वच्छतेसाठी राज्य व राष्ट्रीय पातळीवर 10 कोटींचे बक्षिसे मिळवले. सुंदर व स्वच्छ शहर म्हणून संगमनेरचा लौकिक असून झाडांचे शहर असलेल्या संगमनेर मध्ये 40 गार्डन आहेत.


निवडणूक संपली की विरोधक म्हणून आपण कुणाला कधी पाहिले नाही. सर्वांना बरोबर घेतले .चुकीचे असेल त्याचा बंदोबस्त केला. सुरक्षितता व बंधुभाव असलेले हे शहर सुकून असलेले शहर म्हणून नावारूपास आले. निळवंडे धरण हे आपण केले. धरणाच्या प्लिंथचे काम चालू असताना थेट पाईपलाईन योजना तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याकडून मंजूर करून घेतली. अनेक अडचणी आल्या मंत्री असताना रात्री एक वाजता आलो तर शेतकरी आणि अधिकाऱ्यांबरोबर शेताच्या बांधावर बैठका करायचो. हे पाणी प्रत्येक घरात आले .आज अत्यंत स्वच्छ व निर्मळ पाणी संगमनेरला मिळत आहे.
अनेक विकासाच्या योजना मार्गी लावल्या. नाशिक पुणे रस्त्याची चौपदरीकरण केले. रस्त्याच्या चारही बाजूने चौपदरी रस्ते आहेत. वैभवशाली इमारतींचा हायटेक बस स्थानक निर्माण केले. मात्र आज या रस्त्यांवर वाळू तस्करांचे फ्लेक्स लोंबकळत आहेत. बस स्थानकाची अवस्था दयनीय करून टाकली आहे.
शहर कुठे चालले आहे हा चिंतेचा विषय आहे. हनुमान जयंतीला लोटालोट कोणी केली, सोशल मीडियावर चुकीचे टाकले जात आहे. एजन्सी लावून संगमनेरला बदनाम केले जात आहे. हे एवढे फ्लेक्स येतात कुठून समजून घ्या. शहरांमध्ये गुंडगिरी वाढत आहे. खोट्या केसेस टाकल्या जात आहे .वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशी परिस्थिती पूर्वी कधी नव्हती
विरोधकांची कॉलेज आपण मंजूर केले .अनेक विरोधकांचे उद्घाटने भूमिपूजने मी केली. चांगले वातावरण ठेवले . बंधूभाव आणि विकासाची संस्कृती वाढवली. संगमनेर हे शैक्षणिक हब निर्माण केले .त्यातून बाहेरचे विद्यार्थी येथे आले. बाजारपेठ फुलली.
सातत्याने काम केले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव होईल असे कोणाला वाटले नाही. मुंबई, दिल्लीमध्ये सुद्धा हे कोणाला पटत नाही .यावर राज ठाकरे यांनी सुद्धा मत व्यक्त केले. जनता कार्यकर्ते आहे तेथेच आहे.
धर्माच्या नावावर फसवले जात आहे की आपले शहर हे आपले घर आहे. त्याचा नाश होऊ द्यायचा नाही. काही मंडळी इकडे तिकडे भाषणे करत फिरत आहे. त्यांचे संगमनेर साठी योगदान काय असा सवाल त्यांनी विचारला.
महायुतीमध्ये सर्व अस्वस्थ आहेत . अनेक मंत्र्यांचे घोटाळे आहेत नाशिक प्रकरण, मारामारी ,दारूचे दुकान, विधान भवनातील गोंधळ हा सगळा महाराष्ट्राने पाहिला आहे हे सर्व सुरू असताना कोकाटे चुकलेच परंतु त्यांचा बळी घेतला आहे. गरिबांचे पैसे सरकारने थकवले आहे. विधानसभेमध्ये अनेक फंडे त्यांनी वापरले आता जनतेला कळून चुकले आहे. त्यामुळे आगामी काळामध्ये कार्यकर्त्यांनी आपल्या जागेवर स्थिर राहून भक्कमपणे लढा असे आवाहन केले याचबरोबर जनता सोबत असल्याने नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये विजय होणार असल्याचे ते म्हणाले.
तर साईनगर पुल वाहून गेला. यावेळी हा पूल तातडीने व्हावा याकरता मी प्रस्ताव केला .आमदार सत्यजित तांबे यांनीही पाठपुरावा केला. मात्र सध्याचे सत्ताधारी आणि पालकमंत्री यांनी आपण मंजूर केलेला शॉपिंग कॉम्प्लेक्सचा चार कोटींचा निधी पुलासाठी वापरला आणि उरलेले अडीच कोटी बाहेर दिले. संगमनेर साठी यांचे काय योगदान? त्यामुळे संगमनेर ची संस्कृती आपल्याला टिकवायची आहे. याकरता सर्वांनी एकत्र राहून काम करा विजय आपलाच आहे असे ते म्हणाले
तर माजी आमदार डॉ तांबे म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरमध्ये विकासाच्या अनेक योजना राबवल्या. प्रत्येक वार्डात प्रत्येक गल्लीमध्ये पायाभूत विकासाच्या सुविधा आहेत. संगमनेर हे माजी मंत्री थोरात यांच्यामुळे राज्याच्या नकाशावर आहे. राजकीय संस्कृती आपल्याला टिकवायची आहे.
यावेळी सौ दुर्गाताई तांबे, डॉ जयश्रीताई थोरात, हिरालाल पगडाल, दिलीप पुंड, विश्वासराव मुर्तडक, सोमेश्वर दिवटे, किशोर पवार,ओंकार भंडारी, इसाक खान पठाण, यांनीही आपली मनोगत व्यक्त केली यावेळी शहरातील कार्यकर्ते युवक महिला जेष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



