राजगडावर शिवदुर्गची प्लॅस्टिक स्वच्छता मोहीम…..

युनेस्को मानांकित तिसऱ्या गडकिल्ल्यावर शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन परिवाराने ९३ वी ट्रेकिंग मोहिम आणि ७३ वी प्लॅस्टिक स्वच्छता मोहीम रविवारी राबवली. राजगड, जो स्वराज्याची पहिली राजधानी व छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वाधिक काळ वास्तव्य असलेला ऐतिहासिक गड आहे. तेथे एकूण ९२ सदस्यांनी अभ्यासपूर्ण भटकंती केली. मोहिमेच्या सुरुवातीला पाली दरवाजा येथे गडपूजन करण्यात आले. त्यानंतर अध्यक्ष राजेश इंगळे यांनी गडाचा ऐतिहासिक व नैसर्गिक वारसा याबाबत मार्गदर्शन केले. 

            भटकंती दरम्यान पद्मावती, सुवेळा, संजीवनी माची व बालेकिल्ल्याचा अभ्यासपूर्ण दौरा करून, परतीच्या वाटेवर पडलेले प्लॅस्टिक, बाटल्या, बिस्कीटपुडे कव्हर्स आदी कचरा गोळा करण्यात आला. या उपक्रमात एकूण ६ गोणी प्लॅस्टिक संकलित करून पायथ्याशी वनविभागाच्या कचरा कुंडीत विल्हेवाट लावण्यात आली. 

              या मोहिमेत महिला रणरागिणी, छोटे मावळे यांच्यासह सर्व सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. मोहिमेचे नियोजन डॉ. चंद्रशेखर कळमकर यांनी केले. यामध्ये प्रा. भरत खोमणे, प्रा. प्रमोद परदेशी, संकेत नलगे, तुषार चौधरी, प्रा. प्रणव गलांडे, अमोल बडे, सागर शिंदे, ईश्वर कोठारे, संगिता इंगळे, वैशाली गायकवाड, तारा चांदगुडे, डॉ. अर्चना वाघमोरे, डॉ. रोहिणी गवते, ॲड. गोरख कडूस, ऍड. महेश क्षीरसागर, नितीश गायकवाड, संतोष रोकडे, ऋषिकेश पवार, नवनाथ हिरवे आदींनी विशेष योगदान दिले.

         “गेल्या आठ वर्षांपासून आम्ही सह्याद्रीतील गडकिल्ल्यांवर सातत्याने प्लॅस्टिक स्वच्छता अभियान राबवत आहोत. आजवर ७०६ गोणी प्लॅस्टिक संकलन केले आहे. गडकिल्ले, जंगल व पर्यटनस्थळे प्लॅस्टिकमुक्त व्हावीत, हीच आमच्या सुखाची खरी व्याख्या आहे,” असे अध्यक्ष राजेश इंगळे यांनी सांगितले. शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशनचे सातत्यपूर्ण प्रयत्न गडकिल्ले संवर्धनासाठी एक आदर्श ठरत असल्याचे उपस्थितांनी नमूद केले.

प्रतिनिधी – गणेश कविटकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *