मी भास्कर खेमनर, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा स्वीय सहाय्यक म्हणून काम करतो. मला दररोज विविध कामांच्या निमित्ताने शेकडो फोन येत असतात, त्यातील बऱ्याच लोकांचे नंबर माझ्या मोबाईल मध्ये सेवही नसतात. लोक साहेबांच्या भेटीसाठी वेळ मागतात किंवा काही शासकीय कामकाज सांगत असतात.

संगमनेर मध्ये घडलेल्या आमदार हल्ला प्रकरणातील आरोपीने मला 22 ते 25 तारखेच्या दरम्यान एक दोन वेळा फोन केले होते, त्याने मला ‘साहेब कुठे भेटतील’ एवढेच विचारले. पोलिसांकडून समजलेल्या माहितीनुसार त्याने मला काही व्हाट्सअप मेसेज केले होते. व्हाट्सअप वर मला बरेच मेसेज दररोज येत असतात, अनेक मेसेज मी वाचतही नाही. सर्व मेसेज बघणे मला शक्य होत नाही. सदर प्रसाद गुंजाळ याने मला काय पाठवले हे मला आजही माहित नाही. त्याच्या कोणत्याही मेसेजला माझ्याकडून उत्तर गेलेले नाही. हे सर्व पोलिसांना ठाऊक आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मी प्रसाद गुंजाळ नावाच्या या व्यक्तीला ओळखतही नाही.
साहेबांना भेटण्याची विचारणा करणाऱ्या त्या 15 ते 20 सेकंदाच्या फोन पलीकडे त्याचे माझे आजवर कोणतेही बोलणे नाही. या घटनेशीही माझा दूरपर्यंत संबंध नाही. याप्रकरणी आता माझ्यावर गुन्हा दाखल झाल्याचे मला समजले.
मुळात या व्यक्तिगत व्यवहाराच्या प्रकरणाला राजकीय स्वरूप देण्याच्या दृष्टीने माझ्यावर हे षडयंत्र केले गेले आहे. पोलिसांनी या संपूर्ण प्रकाराचा निरपेक्ष तपास करावा, त्यांना पाहिजे ते सहकार्य करायला आम्ही तयार आहोत. मुळात हे संपूर्ण प्रकरण वैयक्तिक व्यवहाराचे असताना, त्यात राजकारण आणले गेले. लोकनेते बाळासाहेब थोरात यांना बदनाम करण्यासाठी हा सर्व खेळ सुरू आहे. जनता सुज्ञ आहे आणि न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे.



