मालपाणी उद्योग समूहाच्या ‘श्रीं’ ची शाही विसर्जन मिरवणूक !

  • मंगळवारी शहराचे रस्ते गजबजणार; माऊलींचा संजिवन सोहळा ठरणार आकर्षण

संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात आकर्षणाचे केंद्र राहीलेली मालपाणी उद्योग समूहाच्या श्रींची विसर्जन मिरवणूक यंदा तब्बल 11 वर्षांनंतर निघणार आहे. समूहाचे संचालक मनीष मालपाणी यांनी याबाबत प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली असून काही अडचणींमुळे दशकभर बंद असलेली परंपरा यंदापासून सुरु करीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यंदाच्या मिरवणुकीत विविध प्रकारच्या 22 पथकांचा समावेश असून संत ज्ञानेश्‍वर माऊलींच्या संजिवन समाधीसह महादेवाचा जिवंत देखावा मिरवणुकीचे आकर्षण ठरणार आहे. मालपाणी उद्योग समूहाच्या हजारों महिला व पुरुष कर्मचार्‍यांचा सहभाग असलेली ही शाही विसर्जन मिरवणूक येत्या मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता मालपाणी लॉन्स येथून निघेल.

संगमनेरच्या औद्योगिक विकासात मोलाचा वाटा असलेल्या मालपाणी उद्योग समूहात 1949 पासून श्रींची प्रतिष्ठापना केली जाते. तेव्हापासूनच उद्योग समूहातील कामगार व कर्मचारी दहा दिवसांचा हा सोहळा मोठ्या भक्तिभावाने आणि जल्लोशाने साजरा करतात. पूर्वी गणेश स्थापनेच्या दिनीच अतिशय भव्य-दिव्य मिरवणूक काढली जायची, मात्र नंतरच्या काळात रस्ते आणि वर्दळ या कारणाने उद्योग समूहाने त्यात बदल करुन सातव्या दिवशी आकर्षक आणि भव्य विसर्जन मिरवणुकीने बाप्पांना निरोप देण्याची पद्धत रुजवली. मालपाणी उद्योग समूहाच्या मिरवणुकीतील जिवंत देखावे आणि मिरवणुकीची भव्यता आकर्षणाचे केंद्र असून ही मिरवणूक पाहण्यासाठी नागरिक रस्त्याच्या दुतर्फा गर्दी करतात.

गेल्या 76 वर्षांपासून मालपाणी उद्योग समूहातील गणेशोत्सवाची परंपरा आजही अखंडीत असली तरीही 11 वर्षांपूर्वी काही कारणास्तव विसर्जन मिरवणुकीच्या परंपरेत मात्र खंड पडला होता. यावर्षी तो बाजूला करुन समूहाने पूर्वीप्रमाणेच शाही विसर्जन मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी (ता.2) सकाळी साडेदहा वाजता कॉलेज रस्त्यावरील मालपाणी लॉन्स येथून या मिरवणूकीला सुरुवात होणार आहे. बजाज दुचाकी दालनासमोर मालपाणी परिवाराच्यावतीने गणरायाचे पूजन करण्यात येणार आहे. त्यानंतर ही शाही मिरवणूक महामार्गावरुन बसस्थानक, नवघरगल्ली, गवंडीपूरा मशिद, मेनरोडने मालपाणी विद्यालयाजवळ समाप्त होईल.
यावर्षीच्या मिरवणुकीत उद्योग समूहातील कामगार व कर्मचार्‍यांनीच तयार केलेले ढोलताशा पथक, त्याच्या तालावर झांजरी व लेझीमची पारंपरिक नृत्य पथके, महाबलि हनुमानाच्या भव्य मूर्तीसमोर ‘रामजी की निकली सवारी..’ या गीतावरील नृत्य, या शिवाय महाराष्ट्राच्या लोककलेतील विविध नृत्यप्रकार, बांबू डान्स व महाराष्ट्राचे स्तुती गीत सादर होणार आहे. शिर्डी वॉटरपार्ककडून सादर होणारे अक्रोबिट्स आणि साईतीर्थ पार्ककडून काढली जाणारी साईपालखी संगमनेरकरांचे लक्ष वेधणारी ठरेल. यावर्षी संत ज्ञानेश्‍वर माऊलींच्या संजिवन समाधी सोहळ्याचा जिवंत देखावा सादर होणार असून त्यासह महादेवाचा देखावाही संगमनेरकरांच्या आकर्षणाचे केंद्र ठरेल.
मिरवणुकीच्या शेवटी सजवलेल्या रथात श्रींची शाही स्वारी आणि त्याच्या पुढ्यात ज्ञानोबा-तुकोबाचा घोष करणारी भजनीमंडळी अशा थाटात ही मिरवणूक निघणार आहे. संगमनेरकरांनी हा सोहळा पाहण्यासाठी अवश्य उपस्थित रहावे असे आवाहन मालपाणी उद्योग समूहाकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *