पन्हाळा किल्ल्यावर ‘शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशन’चा मानाचा सन्मान, ऐतिहासिक पदभ्रमंती मोहिमेत उल्लेखनीय शिवकार्याबद्दल गौरव

हिल रायडर्स अ‍ॅडव्हेंचर्स फाउंडेशन, कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित ७२ वी पन्हाळा-पावनखिंड राज्यस्तरीय पदभ्रमंती मोहिमेत राज्यभरातील तब्बल ५५० शिवप्रेमींनी सहभाग नोंदवला. या ऐतिहासिक मोहिमेदरम्यान शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशन, श्रीगोंदा या संस्थेचा विशेष सन्मान करण्यात आला. संस्थेच्या गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या गडदुर्ग संवर्धन, ऐतिहासिक वारसा जतन आणि तरुण पिढीमध्ये शिवप्रेम जागवण्याच्या उल्लेखनीय कार्याबद्दल ‘शिवदुर्ग’ला मानपत्र व ट्रॉफी प्रदान करण्यात आली.


हा गौरव शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशनचे अध्यक्ष श्री. राजेश इंगळे, उपाध्यक्ष डॉ. चंद्रशेखर कळमकर, प्रा. भरत खोमणे, मारुती वागस्कर, दिगंबर भुजबळ आणि जिल्हा प्रमुख अक्षय गायकवाड यांनी शेकडो उपस्थित शिवप्रेमींच्या साक्षीने स्वीकारला.

  • “हा सन्मान आमच्या संपूर्ण कार्यकर्त्यांचा आहे” – अध्यक्ष इंगळे
    संस्थेचे अध्यक्ष राजेश इंगळे म्हणाले, “शिवदुर्ग ही केवळ संस्था नाही, तर इतिहासाशी नाळ जोडणारी चळवळ आहे. हा सन्मान म्हणजे आमच्या प्रत्येक शिलेदाराने केलेल्या कष्टांची पावती आहे.”
  • जिंजी-तंजावर मोहिमेची प्रेरणा….
    नुकतीच पार पडलेली जिंजी-तंजावर गडभ्रमंती मोहिम ही संस्थेच्या दृढ निश्चयाची आणि इतिहासाशी असलेल्या नात्याची जिवंत साक्ष होती. यावर हिल रायडर्स फाउंडेशनचे अध्यक्ष श्री.प्रमोद पाटील म्हणाले, “शिवदुर्गचे मावळे केवळ इतिहास जपत नाहीत, तर त्याचा सजीव अनुभव तरुण पिढीपर्यंत पोहोचवत आहेत. त्यांचा सन्मान म्हणजे महाराष्ट्राच्या वैभवाचा सन्मान आहे.”
  • सामाजिक जाणीवा आणि वारसा संवर्धन….
    शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशनने विविध गडांवरील बारव संवर्धन, पायवाट स्वच्छता, पर्यावरण रक्षण यासारख्या उपक्रमांद्वारे सामाजिक कार्यही भक्कमपणे उभारले आहे.
    जिल्हा प्रमुख अक्षय गायकवाड यांनी भावना व्यक्त करताना सांगितले, “हा सन्मान म्हणजे आमच्यासाठी नवी प्रेरणा आणि नव्या जबाबदाऱ्यांची सुरुवात आहे. गडप्रेम, शिवप्रेम आणि इतिहासप्रेम महाराष्ट्राच्या कोपऱ्यात पोहोचवणार हेच आमचं व्रत आहे.”
  • ध्यास शिवदुर्ग, श्वास शिवदुर्ग !
    शिवदुर्ग ट्रेकर्स फाउंडेशनच्या सर्व शिलेदारांनी या सन्मानाने प्रेरित होत. “ही केवळ शाबासकी नाही, तर नव्या मोहिमेची हाक आहे!”अशी सामूहिक भावना व्यक्त केली.
    (प्रतिनिधी – गणेश कविटकर)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *