संगमनेरकरांची अश्वारूढ शिवस्मारकाला पसंती, नगरपालिका सर्वसाधारण सभेत ठराव मंजूर

संगमनेर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचा प्रश्न अखेर मार्गी लागण्याच्या दिशेने निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे. नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत स्मारकाबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला असून संगमनेरकरांनी पूर्णाकृती अश्वारूढ स्मारकाला स्पष्ट पसंती दिली आहे.

शहरात शिवस्मारक उभारण्याचा विषय गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. यासाठी आमदार सत्यजीत तांबे यांनी सातत्याने पाठपुरावा करत नगरपालिकेकडे जागा वर्ग करण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या या प्रयत्नांना यश येत तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मान्यतेने संगमनेर बस स्थानकासमोरील जागा नगरपालिकेकडे वर्ग करण्यात आली. मात्र या स्मारकाच्या जागेच्या लढ्याची सुरुवात यापूर्वीच झाली होती. २०१८ साली तत्कालीन नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या कार्यकाळात बस स्थानक परिसरातील जागा स्मारकासाठी मिळावी यासाठी नगरपालिकेने मागणी केली. त्यानंतर महसूलमंत्री असताना बाळासाहेब थोरात यांनी हा प्रस्ताव मंत्रालयात पुढे नेला. मात्र एसटी महामंडळाच्या धोरणामुळे राज्यातील एसटी आवारात स्मारकास मनाई असल्याने हा विषय दीर्घकाळ प्रलंबित राहिला.

यानंतर २०२३ मध्ये आमदार सत्यजीत तांबे निवडून आल्यानंतर त्यांनी हा विषय पुन्हा मार्गी लावण्यासाठी विशेष पाठपुरावा केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे विशेष बाब म्हणून निर्णय व्हावा यासाठी आग्रह धरला आणि अखेर स्मारकासाठी जागा उपलब्ध झाली. जागा उपलब्ध झाल्यानंतर नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्या अध्यक्षतेखाली दि. ५ ते ७ मार्च दरम्यान नागरिकांमधून “छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक कसे असावे?” याबाबत मतदान घेण्यात आले. या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी सहभाग नोंदवला.

आज जाहीर करण्यात आलेल्या निकालानुसार पूर्णाकृती अश्वारूढ स्मारकाला सर्वाधिक ६,५६४ मते मिळाली. उभ्या स्मारकाला ४,७६१ मते, तर सिंहासनाधीश्वर स्मारकाला ७६१ मते मिळाली. एकूण १२,०८६ नागरिकांनी मतदान केले. या निकालानुसार नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत अश्वारूढ स्मारक उभारण्याचा ठराव मंजूर करण्यात आला असून शहरात लवकरच भव्य स्मारक उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

*शासनाच्या मदतीसह लोकसहभागातून स्मारक उभारणार – आ.तांबे*

छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ स्मारकासाठी अंदाजे दीड कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. या खर्चासाठी शासनाच्या विविध योजनांमधून मदत घेणार आहे तसेच लोकसहभागातून देखील स्मारक उभे करणार असल्याचे आमदार तांबे यांनी स्पष्ट केले.

*एकनाथजी शिंदे यांचे विशेष आभार -*

संगमनेरच्या जनभावनांचा आदर ठेवत विशेष बाब म्हणून स्मारकासाठी जागा वर्ग करण्यास मान्यता दिल्याबद्दल तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे देखील समस्त संगमनेरकरांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *