स्थगित नाशिक-पुणे रेल्वेच्या फेर सर्वेक्षणासाठी रेल्वे मंत्र्यांकडे मागणी करणार – आ. खताळ

  • नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्पासंदर्भात मुंबईत आमदार अमोल खताळ यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक संपन्न

नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पासंदर्भात मुंबई येथे रेल निर्माणचे चीफ इंजिनियर ब्रिजेश कुमार सिंग यांच्यासोबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या सुचनेनुसार झालेल्या या बैठकीत प्रस्तावित रेल्वे मार्ग, अंतिम सर्व्हे तसेच प्रकल्पाच्या पुढील प्रक्रियेबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला असून लवकरच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोकप्रतिनिधींचे शिष्टमंडळ यासंदर्भात केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची भेट घेऊन स्थगित रेल्वे मार्गाच्या फेर सर्वेक्षणाची मागणी करणार असल्याचे आमदार अमोल खताळ यांनी सांगितले.

संगमनेर व परिसरातील नागरिकांच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा असल्याने स्थानिक जनभावना लक्षात घेऊन मार्गातील अडचणी आणि तांत्रिक अडथळ्यांबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. यापुर्वी झालेले सर्वे त्यानुसार येत असलेले अडथळे आणि त्यावरील पर्याय यासंदर्भात रेल निर्माण विभागातील संबंधित अधिकारी यांच्याकडून आढावा यावेळी घेण्यात आला असल्याची माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली.

दरम्यान आमदार खताळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, संगमनेरच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या या रेल्वे प्रकल्पासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे वेळोवेळी पाठपुरावा केला असून राज्य सरकारने याबाबत सकारात्मक भूमिका घेतली आहे. नाशिक-पुणे सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्पामुळे उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील दळणवळण अधिक वेगवान होणार असून औद्योगिक आणि आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे.

विशेषतः GMRT संदर्भातील अडथळा दूर करण्यासाठी पुढील स्तरावर पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे बैठकीत ठरविण्यात आले. या प्रकल्पामुळे नाशिक, संगमनेर आणि पुणे परिसरातील प्रवासाचा कालावधी लक्षणीयरीत्या कमी होणार असून शेती, व्यापार, उद्योग आणि पर्यटन क्षेत्रालाही मोठा फायदा होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. यावेळी बैठकीसाठी विकास क्रांती सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

नाशिक-पुणे रेल्वे प्रकल्पासंदर्भातील सद्य:स्थिती विचारात घेऊन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची लवकरच भेट घेणार आहे. स्थगिती दिलेल्या प्रस्तावित नाशिक-पुणे रेल्वे मार्गाच्या फेर सर्वेक्षणाची विनंती यानिमित्ताने त्यांच्याकडे करणार असून यावर केंद्रीय रेल्वे मंत्री सकारात्मक निर्णय घेतील अशी ठाम अपेक्षा आहे. – आमदार अमोल खताळ ( संगमनेर विधानसभा )

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *