- अमृत उद्योग समूहाच्यावतीने अभिवादन
वयाच्या 19व्या वर्षी स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेणाऱ्या भाऊसाहेब थोरात यांनी आयुष्यभर शब्दांचा पक्केपणा आणि मनाचा सच्चेपणा जपला. स्वातंत्र्यसंग्राम, सर्वसामान्यांसाठी तळमळ, आंदोलने चळवळी, मोर्चे याचबरोबर तालुक्याच्या विकासाची पायाभरणी करताना त्यांनी सामान्य माणसाच्या विकासासाठी आयुष्य समर्पित केले. वयाच्या 84 व्या वर्षी दंडकारण्य अभियान देणारे स्वातंत्र्यसेनानी भाऊसाहेब थोरात समाज विकासासाठी आयुष्यभर झटणारे कृतीशील संत असल्याचे गौरवोद्गार ज्येष्ठ साहित्यिक मल्हार अरणकल्ले यांनी काढले आहे.

अमृत उद्योग समूहाच्या वतीने 16 व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त कारखाना कार्यस्थळावरील प्रेरणास्थळ येथे सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मा.आ.डॉ.सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, ॲड.माधवराव कानवडे, कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग पा.घुले, सौ.दुर्गाताई तांबे,डॉ.जयश्रीताई थोरात, अमेय प्रकाशाचे उल्हास लाटकर, रणजीतसिंह देशमुख, संपतराव डोंगरे, लक्ष्मणराव कुटे, आर.बी.राहणे, रामहरी कातोरे, शरद नाना थोरात, संपतराव गोडगे,नवनाथ आरगडे,योगेश भालेराव, सुरेश थोरात,श्रीराम पवार,सुभाष सांगळे, आनंद वर्पे, साहेबराव कवडे, अण्णासाहेब शिंदे, शांताराम कढणे,प्राचार्य केशवराव जाधव, प्रा.बाबा खरात, भास्करराव बागुल, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांच्यासह अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना मल्हार अरणकल्ले म्हणाले की, वयाच्या 19 व्या वर्षी भाऊसाहेब थोरात यांनी स्वातंत्र्यसंग्रामात उडी घेतली. डॉ.अण्णासाहेब शिंदे यांचे संस्कार त्यांच्यावर झाले. सर्वसामान्यांच्या विकासाचा ध्यास त्यांनी घेतला आणि त्यासाठी आयुष्य समर्पित केले. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर सहकार, शेती,शिक्षण, दूध व्यवसाय यामधून समृद्ध तालुका घडवला.
संघर्ष,लढे,चळवळी,प्रखर ध्येयवाद, राष्ट्रवाद त्यांनी आयुष्यभर जपला. प्रत्येक कामात समर्पण केले. संगमनेर तालुक्याच्या हक्काच्या 30 टक्के पाण्यासाठी मोठा लढा दिला. याचबरोबर रिझर्व बँकेवर मोठा मोर्चा काढला. स्वतःच्या सरकार विरोधात मोर्चा काढणारे ते जनसामान्यांसाठी लढणारे नेते होते.
त्यांच्या आयुष्यभराच्या पुण्य कर्माने अनेकांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण केला आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर संगमनेर तालुक्याच्या विकासाचा पंचवार्षिक आराखडा करणारे दूरदृष्टीचे नेतृत्व त्यांचे होते. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांनी सर्वसामान्यांच्या विकासाचाच विचार केला. वयाच्या 84 व्या वर्षी पर्यावरण संवर्धनाची लोकचळवळ राबवली. हाच लोकसेवेचा वारसा लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी कायम जपला आहे. असे नेतृत्व मिळणे हे भाग्य तालुक्याला लाभले आहे.
राष्ट्र पुरुष, समाजसेवक यांनी त्या वयात काय केले आणि आपण आज काय करतो आहोत याचा विचार तरुणांनी करावा. याचबरोबर हातात हात घालून सर्वांना पुढे घेऊन जाणे हा सहकाराचा खरा अर्थ असून सध्या सर्वत्र सुरू असलेली एकमेकांचे पाय ओढणे हा माणुसकीचा पराभव असल्याचेही ते म्हणाले.
तर मा.आ.डॉ.तांबे म्हणाले की, दुष्काळी तालुका ते विकसित तालुका हा सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या दूरदृष्टीतून निर्माण झाला. नैतिकता हा त्यांच्या कार्याचा पाया आहे. नैतिकतेवर आधारित संगमनेरचा सहकार असल्यामुळे तो आज देशाला दिशादर्शक ठरत आहे. शेती, शिक्षण, सहकारातून संगमनेर बरोबरच राजहंस हा विश्वासाचा ब्रँड त्यांनी तयार केला. सर्वसामान्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याकरता एसएमबीटी सेवाभावी हॉस्पिटलच्या रूपाने मोठी स्वप्न पाहिले आज ज्या ठिकाणाहून हजारो नागरिक उपचार घेत आहेत. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन पांडुरंग पा. घुले यांनी केले. यावेळी अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी अधिकारी कार्यकर्ते शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.



लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी दादांच्या समृद्ध विचारांचा वारसा जोपासला
आयुष्यभर सर्वसामान्यांच्या विकासासाठी तळमळ, सच्चेपणाने आणि निष्ठेने समर्पित भावनेने काम करण्याची पद्धत आणि जनमाणसांच्या चेहऱ्यावर निर्माण होणारा आनंद हाच मोठा ठेवा घेऊन काम करणाऱ्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या नैतिकता,शिस्त,आदर्श आणि लोककल्याणाचा वारसा लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी जपला असून महाराष्ट्राला या नेतृत्वाची गरज असल्याचे गौरवोद्गार ज्येष्ठ विचारवंत मल्हार अरणकल्ले यांनी काढले आहे.

भजन संध्याने भक्तीमय वातावरण
पुण्यस्मरण दिनाच्या पूर्वसंध्येला सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या नवीन ऑडिटोरियम हॉलमध्ये प्रा.विनोद राऊत व सहकाऱ्यांनी भजन संध्या संपन्न झाली. संत चोखामेळा, संत जनाबाई, संत तुकाराम, संत नामदेव,संत एकनाथ यांच्या विविध अभंगांनी अत्यंत भक्तीमय वातावरणामध्ये बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल ते भजनात दंग सारे अशा विविध अभंग व भजनांमधून उपस्थित सर्वजण भजनात रमून गेले.



