शेतकरी मेळाव्याच्या नावाखाली धमकी आणि दहशतीचे राजकारण – रामभाऊ राहाणे

आमदार खताळांमुळेच विरोधकांवर दारोदार फिरण्याची वेळ

चाळीस वर्ष सत्ता भोगणाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे, बगलबच्चे ठेकेदारांच्या दहशत आणि दडपशाहीमुळे संगमनेरकर जनतेनं उत्स्फूर्तपणे शिवसेना महायुतीच्या माध्यमातून आमदार अमोल खताळ पाटील यांच्या हाती सत्ता दिली. परंतु विधानसभा निवडणुकीत अद्दल घडूनही शेतकरी मेळाव्याच्या नावाखाली गावोगाव राजकीय कार्यक्रम घेऊन धमक्या आणि दहशत निर्माण करण्याचे प्रकार भावी जिल्हा परिषद सदस्य म्हणून गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या कॉंग्रेसी लोकांकडून केले जात आहेत. अशी टीका शिवसेना तालुकाप्रमुख रामभाऊ राहाणे यांनी कॉंग्रेसच्या पिंपरणे येथील कार्यक्रमात शरद थोरात यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेताना केली.

  शिवसेना तालुकाप्रमुख राहाणे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, शेतकरी मेळाव्याच्या नावाखाली घेतलेल्या सभेत एकाही वक्त्याने शेतकरी हिताचे अवाक्षरही न काढता फक्त संगमनेरचे लोकप्रतिनिधी आमदार अमोल खताळ आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांना धमकावण्याची वक्तव्य केली. सत्ता आणि पदांसाठी हपापलेल्या थोरात टोळीचा जिल्हा परिषद निवडणूकीतील उमेदवारच भर सभेच्या मंचावरून म्हणतो "आमच्या नादी लागाल तर तालुक्यात फिरणं मुश्किल होईल, मातीत गाडून टाकू, चॅलेंज देतो वाचवायला येणार नाही, तलवार बनणार" ही वक्तव्यं सुसंस्कृततपणाचा मुखवटा घातलेल्या माजी मंत्र्याच्या समोर केली गेली. 

कॉंग्रेसकडून निवडणूकीसाठी सर्वसामान्य मतदार, शेतकरी आणि महायुतीचे कार्यकर्ते यांच्यावर दबावतंत्राचा वापर वारंवार केला जातो. पिंपरणे येथील सभेच्या निमित्ताने गावपातळीवर पुन्हा एकदा थोरातांचा दहशतवाद सुरू झाल्याचे स्पष्ट होते. लोकशाहीत अशाप्रकारची दडपशाही स्वाभिमानी संगमनेरकर खपवून घेणार नाहीत. तसेच योग्य वेळी योग्य उत्तर महायुतीच्या माध्यमातून दिले जाईल असा इशारा राहाणे यांनी दिला. 

आमदार अमोल खताळ यांना ‘कालचं पोरग’ म्हणणार्‍यांना सांगायचं आहे की, याच कालच्या पोराने तुमच्या भावी मुख्यमंत्र्यासहीत तुमच्या पूर्ण थोरात टोळीला सर्वसामान्य जनतेच्या दारोदार फिरण्यास भाग पाडले आहे. तुम्ही आज जे जनतेचे उंबरठे झिजवत आहात त्याचे कारण आमदार खताळच आहेत. त्यांच्यामुळेच यापुर्वी कधी न दिलेली कारखान्याची सभासदांच्या हक्काची 30 किलो साखर वाटप करावी लागली. तसेच गेल्या वर्षभरात तालुक्यात मोठ्याप्रमाणात आलेला निधी आणि टप्प्याटप्याने मार्गी लागत असलेली कामे यामुळे तुमची पोटदुखी वाढली असल्याची टीका शिवसेना तालुकाप्रमुख रामभाऊ राहाणे यांनी केली.

शरद थोरात यांची अख्खी हयात ठेकेदारी करण्यात गेली. ती ठेकेदारी सुरू रहावी म्हणून ज्यांची बाजू धरून भाषण करत आहेत त्यांचीच साथ त्यांनी सोडली होती, याचा विसर जिल्हा परिषद सदस्य होण्याची स्वप्नं पाहणार्‍या शरद थोरात यांना पडलेला दिसतो. विशेष म्हणजे बहिणीच्या विरोधातच निवडणूक लढवून परिवाराला अडचणीत आणले, मात्र ठेकेदारी बंद झाल्यामुळे पुन्हा कुटुंबाची आठवण झाली की काय? असा सवाल राहाणे यांनी उपस्थित केला. 

संगमनेर महायुतीच्या प्रयत्नांनी शासकीय योजनेतून लाभार्थ्यांना वाटप करण्यात येणार्‍या वस्तूंवर विरोधक टीका करत आहेत. मात्र तालुक्याच्या इतिहास प्रथमच इतक्या मोठ्याप्रमाणात विविध योजनांचा लाभ नागरिकांना मिळत आहे. दुसरीकडे तुमच्या चाळीस वर्षातील उदासीन कामाने राजकीय कार्यक्रमाला गर्दी होत नाही. पिंपरणे येथील सभेला गर्दी जमवण्यासाठी शेतकरी मेळाव्याचे नाव देण्याचे नाटक केले. विविध मार्गांनी पैसे खर्च करून, जेवण देऊन आणि दबाव टाकून लोक जमवले गेल्याचे वास्तव असल्याचे शिवसेना तालुकाप्रमुख राहाणे यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *