संगमनेरच्या जनतेला अभिवादन ! – मधुकर भावे

संगमनेर येथील संतप्त जनता चार दिवसांपूर्वी रस्त्यावर उतरली. बाळासाहेब थोरात यांना दिलेल्या धमकीनंतर त्या विरोधात स्वयंस्फूर्तपणे हा मोर्चा रस्त्यावर उतरतो… त्याचा दुसरा अर्थ असा आहे की, महात्मा गांधींची हत्या करून जसा गांधी संपू शकला नाही… जगात ६०० विद्यापीठात आजही ‘गांधी’ शिकवला जातोय… त्याचप्रमाणे संगमनेरची जनता आपल्या नेत्याला दिलेली धमकी सहन करून गप्प बसण्याएवढी शेळपट नाही. हेही या जनतेने महाराष्ट्राला दाखवून दिले. नेतृत्त्व नसताना हा मोर्चा निघालेला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेची राजकीय मरगळ या मोर्चाने घालवली, असा या मोर्चाचा पहिला अर्थ आहे.

            सध्या महाराष्ट्रात जे काही चालले आहे… त्याबद्दल खाजगीमध्ये सगळेच पक्षनेते नाराजी व्यक्त करतात. पण, प्रत्यक्षात जे काही चालले ते कोणीच थांबवत नाही. असा महाराष्ट्र कधीच नव्हता. लोकांच्या जीवन-मरणाचे प्रश्न बाजूला पडले असताना, आरोप-प्रत्यारोप, शिवीगाळ-मारामारी, फोडा-फोडी आणि त्यासाठी स्वत:ला वाहून घेतलेल्या सगळ्या वृत्तवाहिन्या…. महाराष्ट्राची अशी वैचारिक आणि सामाजिक अधोगती कधीच झालेली नव्हती. विरोधी पक्षाची न्याय प्रश्नांवरील आंदोलने संपल्यात जमा आहेत. लढणारा नेताच नाही… सामान्य माणसांचे प्रश्न ढिगभर आहेत. ते प्रश्न बाजूला पडलेले आहेत. अतिवृष्टीने लाखो हेक्टर पिकांचे नुकसान झाल्याचे मुख्यमंत्रीच सांगत आहेत. हजारो घरांत पाणी आहे… चिखल आहे… कच्चे-बच्चे उघड्यावर आहेत… गेल्यावर्षीच्या कापसाला, सोयाबीनला भाव नाही… उभी पिके नष्ट झाली आहेत. त्याची चर्चा कुठेच नाही. त्याच्यावर उपाय नाही. शेतकऱ्यांना मदतीसाठी धावलेले कोणी दिसत नाही. आव्हाने-प्रतिअव्हाने यामध्ये गुंतून पडलेल्या महाराष्ट्राला एक मरगळ आल्यासारखी झाली होती. निवडणुकीतील पराभवानंतर महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचे विरोधक खचून गेल्यासारखे वाटले. निवडणुका येतील आणि जातील…. निवडणूकीतील विजय हा लोकशाहीचा एकमेव निकष नाही. लोकांचे प्रश्न घेवून रस्त्यावर उतरणारी चळवळ यापूर्वी महाराष्ट्राने पाहिलेली आहे. अशाच स्थितीत महाराष्ट्रातील मरगळ आलेल्या जनतेला संगमेनरच्या जनतेने एक धडाच दिलेला आहे. यातून महाराष्ट्राला एक प्रेरणा मिळालेली आहे.

            विषय आहे बाळासाहेब थोरात यांना आलेल्या धमकीचा… धमकी काय स्वरूपाची आहे…. तर, कोणी एक ह. भ. प. किर्तनकार नथुराम गोडसे यांचे नाव घेवून धमकी देत आहे… नथुराम गोडसे यांनी गांधींना मारले… गांधींची हत्या झाली. पण, गांधींना मारता आले नाही… गांधी आजही जिवंत आहेत… आणि जगात गांधींचा गौरव आहे. देशाच्या पंतप्रधानांनाही भारताच्या स्वातंत्र्य दिनाला ध्वजारोहण केल्यानंतर महात्मा गांधी यांच्या समाधीसमोर अभिवादन करावे लागते. महात्मा गांधी यांचा फोटो आजही नोटेवर छापला जातो. जगातील ६०० विद्यापीठांत गांधी शिकवला जातो. जगातील सर्वात जास्त सव्वा लाख पुस्तके एकट्या गांधींच्या नावावर आहेत. ७० देशांमध्ये गांधींचे पुतळे उभे आहेत. जगातील १५० देशांत गांधींच्या स्मरणार्थ तिकीटे काढलेली आहेत. अशा या गांधींना गोडसेंनी मारले म्हणून गांधी संपला नाही… आणि गांधी-नेहरू संपत नाहीत, हेच आजच्या राज्यकर्त्यांचे सगळ्यात मोठे दु:ख आहे. अशा या गांधींना मारणाऱ्या माणसाचे नाव घेवून बाळासाहेबांना धमकी दिली गेली. विधानसभा बाळासाहेबांना ‘पराभूत’ म्हणून जाहीर केले गेले असले तरी संगमनेरची जनता बाळासाहेबांच्या बरोबर आहे. आणि अशा धमकी देणाऱ्यांच्या विरोधात आहे. हे या जनतेने दाखवून दिले आहे. संगमनेर निघालेल्या त्या प्रचंड मोर्चाचा नेता कोणी नव्हता.  जनता त्या मोर्चाची नेता होती. आणि अशा या जनतेने धमक्यांच्या विरोधात आवाज उठवला. त्याचे प्रतिसाद महाराष्ट्रभर उमटले. मोर्चासमोरील भाषणात बाळासाहेबांनी ठणठणीत उत्तर दिले.

            संगमनेरच्या जनतेला थोरात घराण्याचे कर्तृत्त्व माहिती आहे. त्यावेळचा नगर जिल्हा, आताचा अहिल्यानगर जिल्हा, हा एकेकाळचा दुष्काळी जिल्हा होता. त्या दुष्काळी जिल्ह्यात संगमनेर कुठे होते आणि आज कुठे आहे…? कुणामुळे आहे…? कशामुळे आहे…? स्वातंत्र्य चळवळीच्या आंदोलनातील भाऊसाहेब थोरात, आण्णासाहेब शिंदे, रावसाहेब शिंदे , कडू-पाटील आणि अनेक सहकाऱ्यांनी केवढा मोठा त्याग केला, हे लोक जाणतात. स्वातंत्र्यानंतरही सामान्य माणसांचे प्रश्न घेवून हेच नेते लढत होते. सहकारामध्ये याच नेत्यांनी मोठे काम उभे केले. त्याखेरिज त्यावेळच्या नगर जिल्ह्यातील विठ्ठलराव विखे, शंककराव कोल्हे, शंकरराव काळे, यशवंतराव गडाख, आप्पासाहेब राजळे, बी. जे. खताळ, बाबुराव तनपुरे अशा अनेकांची कामगिरी मोठी आहे. पण गेल्या ४५ वर्षे महाराष्ट्राच्या राजकारणात लोकांसमाेर असलेले या जिल्ह्यातील एकमेव नेते म्हणजे बाळासाहेब थोरात आहेत. या बाळासाहेबांनी सलग आठ निवडणुका जिंकल्या. नवव्या निवडणुकीत ते पराभूत झाले. ते कसे पराभूत झाले याची चर्चा नंतर मनसे नेते  राज ठाकरे यांनीही जाहीर सभेत केली. निवडणुकीतील ‘जय-पराजय’ हा मुद्दा येथे नाही… सध्याचे महाराष्ट्रातील वातावरण राजकीयदृष्ट्या निकोप नाही, हे सगळेचजण मान्य करतात… पूर्वी सरकारला विरोध होता..  विरोधक थोडे होते.. पण रस्त्यावरची आंदोलने ही विरोधकांच्या बाजूने होती आणि लोकांचे प्रश्न घेवून विरोधक लढत होते. आज लोकांचे प्रश्न जसे आहेत तसेच आहेत…. रस्त्यांवर चळवळ नाही… कारण विरोधात त्या ताकतीचा नेताच नाही. उद्धवराव पाटील, एन. डी. पाटील नाहीत… गणपतराव देशमुख नाहीत… ए. बी. बर्धन नाहीत… जॉर्ज फर्नांडीस नाहीत… मृणालताई गोेरे नाहीत…. विदर्भात जांबुवंतराव धोटे नाहीत… अशी लढणारी अनेक माणसं आज नाहीत. हे नेते सरकारात कधीच नव्हते.  आंदोलन केल्यामुळे जनता आपल्याला निवडून देईल आणि आपण बहुमत मिळवू, अशा भ्रमातही ते नव्हते… पण रस्त्यावरच्या लढाईत त्यांचे बहुमत होते… त्यामुळे सरकारला एक धाक होता… आज महाराष्ट्रात नेमकी त्याचीच उणीव आहे. सरकारला रान मोकळे मिळाले, याचे कारणही तेच आहे. कारण रस्त्यावर उतरण्यासाठी जे चारित्र्य लागते तसा नेता आज नाही… एकटे शरद पवार सोडले तर दुसरा नेता मोठा नेता काेण? शिवाय त्यांच्या रस्त्यावर उतरण्याच्या नैसर्गिक मर्यादा आहेत… तरीही ते आज हिंमतीने उभे आहेत.

            ६५ वर्षांपूर्वी संयुक्त महाराष्ट्र झाला… त्यासाठी लढलेला कामगार आणि शेतकरी आज नेमका काय अवस्थेत आहे? ४९ हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या… त्यामुळे मुख्य प्रश्न बाजूला पडलेत… जात-धर्मामध्ये महाराष्ट्र गुरफटून गेला आहे. या स्थितीमध्ये ४० वर्षे बाळासाहेब थोरात हे लोकांसमोर आहेत. १९८० सालानंतर निळवंडे हे एकमेव धरण कसे पूर्ण झाले…. त्याच्यासाठी आटापिटा कोणी केला… हे सगळं उभा महाराष्ट्र जाणतो… त्याचे श्रेय बाळासाहेबांचेच आहे… शिवाय सगळ्या सामाजिक-शैक्षणिक सहकारी संस्थांमध्ये संगमनेर हा जिल्हा आज आघाडीवर आहे. त्यामुळे निवडणुकीत पराभूत झाले तरी संमगनेरची जनता बाळासाहेबांचे नेतृत्त्व स्वीकारते. त्यांच्यासाठी रस्त्यावर येते. हे बाळासाहेबांच्या कर्तृत्त्वाचे यश आहे. निवडणुकीत पराभव होत असतात. इंिदरा गांधीही पराभूत झाल्या होत्या… विलासराव देशमुखही पराभूत झाले होते…  पण, संगमनेरमध्ये पराभूत झालेला नेता मतदारसंघातील जनतेच्या मनात किती खोल आहे… याचा प्रत्यय सामान्य जनतेने दाखवून दिलेला अाहे. ज्या कोणी बाळासाहेबांना धमकी दिली… ते िकर्तनकार ह. भ. प. आहेत, असे म्हणतात… असे काही ह. भ. प. आता राकारणात घुसवले गेले आहेत का? अशी चर्चा यानिमित्ताने सुरू आहे. आणि हे कुणी घुसवले? ह. भ. पं. ची महाराष्ट्रात फार  मोठ्या संत परंपरेचे ते प्रतिनिधी आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल समाजाला आदर आहे.. पण, असे राजकारणातून ह. भ. प. मध्ये कोणी घुसवले गेले असतील तर…. आज महाराष्ट्रात तोच प्रश्न विचारला जात आहे….

            सध्याच्या सरकारने ‘जनसुरक्षा कायदा’ करताना ‘अर्बन नक्षल’ हा शब्द माननीय मुख्यमंत्र्यांनी  वापरलेला आहे. शब्दकोषात एका नवीन शब्दाची भर पडलेली आहे. ही अशी धमकी जनसुरक्षा कायद्यात बसते की नाही…. त्याचा निर्णय होणार नाही… कारण हा कायदा कोणाचीतरी  राजकीय ‘सोय’ आणि काहींसाठी ‘गैरसोय’ यासाठीच केलेला आहे. पण, जनता त्याची चिंता करत नाही. जनतेच्या मनात ज्या भावना आहेत, त्या व्यक्त झालेल्या आहेत. त्यामुळे बाळासाहेब थोरात यांना दिलेली ‘धमकी’ कुणी दिली यापेक्षा त्याच्या मागे कोण? हे जास्त महत्त्वाचे आहे.

            शेवटी महाराष्ट्राच्या राजकारणात हे जे गढूळ वातावरण निर्माण झालेले आहे, हे थांबवण्याची जबाबदारी राज्याच्या नेतृत्त्वाची असते… पण, आजतरी असे वाटत आहे की, हे असेच चालत राहणार… शेवटी लोकांमध्येच नेतृत्त्व तयार होऊन जनता संगमनेरच्या जनतेप्रमाणेच संतप्त होऊन रस्त्यावर ज्या दिवशी उतरेल, त्या दिवशी अनेक प्रश्नांची उत्तरे मिळतील… त्यामुळे संगमनेरच्या जनतेने आता हा विषय हातात घेतला असल्यामुळे महाराष्ट्रातील तमाम प्रश्नांना नेमके उत्तर म्हणजे शांततामय मार्गाने लोकांनी आपला संताप व्यक्त करणे… आणि हाच गांधी मार्ग आहे. गांधी-नेहरू कोणाला नकोसे वाटले तरी… त्यांचा उल्लेख केल्याशिवाय ५०-६० वर्षे कोणालाच राज्य करता येत नाही… अाज देशात आणि महाराष्ट्रात राज्यकर्त्यांची परिस्थिती अशी आहे की, त्यांच्या एकट्याच्या पक्षाच्या जोरावर देशात आणि महाराष्ट्रात सरकार आणणे शक्य नाही… म्हणून नाईलाजाने त्यांनी जी मोट बांधली आहे त्या राजकीय तडजोडीमध्ये अंतर्गत मतभेद कमालीचे असतानाही, सत्ता हा त्याचा केंद्रबिंदू आहे. लोकांना आता सर्व गोष्टी समजलेल्या आहेत. त्यामुळे सध्याचे दिवस हे नक्कीच जातील… संगमनेरच्या मोर्चाने हाच संदेश महाराष्ट्राला दिलेला आहे.

            बाळासाहेबांनी ज्या हिमतीने हा विषय हाताळला त्याबद्दलही त्यांचे अभिनंदन आणि संगमनेरच्या जनतेला अभिवादन.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *