राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने ‘रक्षाबंधन’ उपक्रम – पोलीस बांधवांना राखी बांधून व्यक्त केला बंधुभाव

श्रीगोंदा – महाराजा जिवाजीराव शिंदे महाविद्यालय, श्रीगोंदा येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभाग यांच्या वतीने २ ऑगस्ट ते १४ ऑगस्ट २०२५ या कालावधीत ‘हर घर तिरंगा’ हा राष्ट्रप्रेम जागवणारा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून १३ ऑगस्ट रोजी श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये रक्षाबंधन सोहळा उत्साहात पार पडला.

             या विशेष उपक्रमात महाविद्यालयाच्या स्वयंसेविका विद्यार्थिनींनी श्रीगोंदा पोलीस स्टेशनमधील पोलीस बांधवांना राखी बांधून त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व आदर व्यक्त केला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पोलीस निरीक्षक श्री. किरण शिंदे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “रक्षाबंधन हे केवळ बहीण-भावाचे नाते जोडणारे सण नसून समाजातील सुरक्षिततेची, विश्वासाची व बांधिलकीची आठवण करून देणारा सण आहे. पोलीस दल २४ तास समाजाच्या रक्षणासाठी तत्पर असते आणि हे नाते फक्त सणापुरते मर्यादित राहता कामा नये.”

              यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एम. आर. जरे यांनी आपल्या भाषणात म्हटले की, “पोलीस बांधव हे आपल्या समाजातील अदृश्य कवच आहेत. आपण निश्चिंतपणे आयुष्य जगत असताना ते मात्र दिवस-रात्र आपले रक्षण करत असतात. त्यामुळे त्यांच्याविषयीचा आदर, कृतज्ञता आणि बांधिलकी ही प्रत्येक नागरिकाने मनापासून जोपासावी.”

           कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. बी. ए. बुलाखे आणि प्रा. डी. एम. बहिरम यांनी केले. या कार्यक्रमात उपप्राचार्य डॉ. पी. एन. साळवे, कला विभाग उपप्राचार्य प्रा. एस. एम. भुजबळ, वाणिज्य विभाग उपप्राचार्य डॉ. नितीन थोरात, सायन्स विभागातील प्राध्यापकवर्ग उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजना सदस्य डॉ. सुप्रिया पवार, प्रा. म्हस्के मॅडम, प्रा. रायकर मॅडम यांनीही सक्रिय सहभाग नोंदविला.

              कार्यक्रमादरम्यान पोलीस स्टेशन परिसरात देशभक्तिपर घोषवाक्ये, ‘हर घर तिरंगा’ अभियानाची माहिती, व रक्षाबंधनाचा सांस्कृतिक अर्थ यावरही चर्चा झाली. हा उपक्रम महाविद्यालय, विद्यार्थी आणि पोलीस प्रशासन यांच्यातील आपुलकीचे व एकात्मतेचे बंध आणखी मजबूत करणारा ठरला.

(प्रतिनिधी – गणेश कविटकर)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *