संगमनेर तालुक्यातील कासारा दुमाला येथील ग्रामस्थांच्या शेतजमिनींवर चुकीची नावे, पोकळीस्त नावे व अनधिकृतरीत्या चढवलेल्या नोंदी असल्याच्या गंभीर तक्रारींवर ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने आमदार अमोल खताळ यांनी भेट घेतली .ग्रामस्थांच्या व्यथा ऐकल्यानंतर आमदार अमोल खताळ यांनी तातडीने सकारात्मक प्रतिसाद देत हा विषय सरकारदरबारी घेऊन जाण्याचे आश्वासन दिले. त्यांनी प्रशासनाशी समन्वय साधून लवकरात लवकर या नोंदी दुरुस्त करण्यासाठी ठोस पाठपुरावा करण्याचे स्पष्ट केले.

शेतकऱ्यांच्या उताऱ्यावर इतरांची पोकळीस्त नावे चढवली गेली असून, काही ठिकाणी मालक नसलेल्या व्यक्तींची नावे नोंदवली गेली आहेत. त्यामुळे जमिनीचे व्यवहार, पीक कर्ज प्रक्रिया, सरकारी अनुदाने व इतर महत्त्वाच्या शेतकरी योजनांमध्ये अडथळे येत आहेत. या गंभीर बनलेल्या समस्येवर तातडीने उपाययोजना व्हावी, या मागणी साठी कसारा दुमाला येथील ग्रामस्थांनी आमदार अमोल खताळ यांची भेट घेत निवेदन दिले.
दरम्यान, विधानसभा पावसाळी अधिवेशन काळापासूनच याप्रकरणी आ अमोल खताळ यांनी या अन्यायाविरोधात आवाज उठवला आहे. यापूर्वीच संगमनेर मधील इंदिरानगर, गुंजाळवाडी, कासारा दुमाला, समनापूर, राजापूर व अन्य भागां तील नागरिकांच्या अडचणी सोडविण्या साठी पाठपुरावा सुरू केला आहे. आ. खताळ यांनी महसूलमंत्री ना. चंद्रशेखर बावनकुळे यांना विविध निवेदनांद्वारे समस्या सविस्तर मांडली असून संबंधित नोंदी रद्द करून मूळ ताबेदारांना न्याय मिळावा यासाठी सकारात्मक हस्तक्षेप करण्यासाठी बैठक बोलवण्याची मागणी केली आहे.या बैठकीदरम्यान चर्चा व्हावी यासाठी ग्रामस्थांनी अजून काही महत्त्वा च्या बाबी आमदार अमोल खताळ यांच्या निदर्शनास आणून दिल्या व त्या मुद्द्यांचा समावेश असलेले निवेदनही आज सुपूर्द केले.या चर्चेनंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने या प्रकरणात बैठक बोलावण्या च्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. यामुळे या प्रकरणातील कार्यवाहीला वेगयेण्याची अपेक्षा आहे.या निर्णयामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे व आत्मविश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या अपेक्षा आता प्रत्यक्ष कृतीतून पूर्ण होतील अशी आशा व्यक्त होत आहे.
शेतकऱ्यांच्या हक्कांवर कुठलाही अन्याय होऊ देणार नाही. ही बाब माझ्या व्यक्तिगत लक्षात असून, ग्रामस्थांना न्याय मिळवून देण्यासाठी मी पूर्ण ताकदीने प्रयत्न करणार आहे . या जमिनीच्या व्यवहारामध्ये जे भू माफिया आहेत ते कोणाचे बगलबच्चे आहेत हे मलामाहिती आहे. त्यामुळे काळजी करू नका, हे सरकार सर्वसामान्यांचे सरकार आहे आणि मी स्वतःही सर्वसामान्य आहे,” त्यामुळे तुमच्या पाठीमागे भक्कम उभा राहील अशी ग्वाही आमदार अमोल खताळ यांनी दिली.



