कृषी क्षेत्रात शाश्वत योजना राबविणाऱ्या माजी कृषी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा आदर्श वादग्रस्त कृषीमंत्र्यांनी घ्यावा.

  • महाराष्ट्राला सर्वाधिक कृषी उत्पन्नाचे राज्य बनवणाऱ्या बाळासाहेब थोरात यांचा कार्यकाळ शेतकऱ्यांसाठी आजही आशादायी.
  • 6 वर्ष कृषी मंत्री पद सांभाळताना 1 लाख शेततळे निर्मितीसह विविध योजनांबरोबर शेतकऱ्यांना केले सक्षम

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांचा वारसा सांभाळणारे माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात आपल्या कृषी मंत्री पदाच्या काळात यांनी 1 लाख शेततळ्यांच्या निर्मितीसह महापिक अभियान, पिक विमा, ऑनलाइन योजना राबवताना महाराष्ट्राला देशातील सर्वाधिक कृषी उत्पन्न करणारे राज्य बनवले. हा आदर्श सध्याच्या कृषीमंत्र्यांनी घेणे गरजेचे असून महायुतीचे कृषिमंत्री वादग्रस्त ठरत असताना महाराष्ट्राला बाळासाहेब थोरात यांच्या शेतकऱ्यांसाठी शाश्वत मदतीच्या ठरलेल्या कार्यकाळाची आठवण होत असल्याचे जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष तथा प्रगतशील शेतकरी ॲड माधवराव कानवडे  यांनी म्हटले आहे.

कृषी क्रांतीचे जनक डॉ. स्वामीनाथन यांच्या जन्मशताब्दी जयंती निमित्त सध्याच्या कृषीमंत्री पदांबाबत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नां बाबत शेतकरी आंदोलन समितीच्या वतीने प्रगतशील शेतकरी रवींद्र भोकनळ, आनंदा गाडेकर , राजेंद्र कहांडळ यांच्यासह दिलेल्या प्रसिद्ध पत्रकार म्हटले आहे की,  महाराष्ट्रात सध्या महायुतीचे सरकार आहे आणि महायुतीचे अब्दुल सत्तार, धनंजय मुंडे, ॲड.माणिकराव कोकाटे यांचा कार्यकाळ शेतकऱ्यांसाठी कृतिशील ठोस योजना राबवण्यापेक्षा वादग्रस्ततेमुळे चर्चेत आले. त्यामुळे कृषी खात्याची महत्त्व कमी होते की काय अशी भीती सर्वसामान्य शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली.

भारत हा कृषिप्रधान देश आहे आणि शेतकऱ्यांचे मोठे महत्त्व आहे. म्हणून 2004 मध्ये 75 हजारांच्या वर विक्रमी मताधिक्याने निवडून आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी त्यांचे विश्वासू सहकारी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना कोणते खाते पाहिजे असे विचारले. त्यावर शेतकरी पुत्र असलेल्या बाळासाहेब थोरात यांनी कृषिमंत्री होण्याची इच्छा व्यक्त करून हे खाते मागितले. आणि 9 नोव्हेंबर 2004 रोजी महाराष्ट्राचे कृषी व जलसंधारण विभागाचे कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.


यानंतर कृषी खात्यामध्ये अमुलाग्र बदल करत त्यांनी कृषी विद्यापीठांना शेतकऱ्यांच्या दारी पोहोचवले. कृषी विद्यापीठातले संशोधक, शास्त्रज्ञ शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना मार्गदर्शन करू लागले. याचबरोबर जमिनीचा पोत, माती परीक्षण केंद्र सुरू केले. विद्यापीठांमार्फत विविध योजना लागू केल्या. राज्यभरात 1 लाख शेततळ्यांची निर्मिती केली. महापीक अभियान ही योजना राबवली. शेतकऱ्यांसाठी कृषी दिंड्या, शिवार फेरीचे आयोजन केले. कृषी योजनांची ऑनलाईन माहिती शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली. शेतकऱ्यांना खत क्रेडिट कार्ड, पिक विमा, अपघाती, विमा अशा योजना राबवताना 2004 ते 2009 या कार्यकाळात महाराष्ट्राला देशातील सर्वाधिक कृषी उत्पन्न बनवणारे राज्य करण्याचा मान तत्कालीन कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकाळात मिळाला.


याचबरोबर 2008 मध्ये यूपीए अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी, तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग व केंद्रीय कृषिमंत्री खा.शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळवून देण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा राहिला. स्वर्गीय विलासराव देशमुख यांची अत्यंत विश्वासू सहकारी असलेले बाळासाहेब थोरात यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक योजना तात्काळ राबवल्या. अवकाळी पाऊस, दुष्काळ, अतिवृष्टी, अशा संकटाच्या काळात शेतकऱ्यांना सातत्याने आणि तात्काळ भरीव मदत सरकारमार्फत मिळवून दिली. या खात्याला गौरव प्राप्त करून दिला. याचबरोबर जलसंधारण खात्याच्या माध्यमातून राज्यभरात साखळी बंधार्यांतची निर्मिती केली.


कृषी खाते हे अत्यंत महत्वाचे असून आज 7 ऑगस्ट रोजी कृषी क्रांतीचे जनक डॉ. स्वामीनाथन यांचा जन्मदिन आहे. या खात्यामध्ये डॉ.स्वामीनाथन व हरितक्रांतीचे प्रणेते डॉ अण्णासाहेब शिंदे यांनी हरितक्रांती घडून आणली. हा समृद्ध वारसा मा. कृषी व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी जपला.
तर याउलट सध्या महायुतीचे विविध कृषिमंत्री मात्र वादग्रस्त ठरले आहेत. अनेकांची खाती बदल झाली आहे. कृषी खात्याचे महत्व कमी होते की काय अशी भीती वाटत असताना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना बाळासाहेब थोरात यांच्या चांगल्या आणि शेतकऱ्यांना शाश्वत व तात्काळ मदत करणाऱ्या कार्यकाळाची आठवण होत आहे.

१. संगमनेर तालुक्यात शेततळ्यांसह प्रत्येक गावोगावी साखळी बंधाऱ्यांची निर्मिती
कृषिमंत्री पदाच्या काळात 1 लाख शेततळ्यांची निर्मिती राज्यभर झाली असताना संगमनेर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात शेततळे निर्माण केले यातून फळबागा फुलल्या आणि शेतकऱ्यांच्या दारी समृद्धी आली. याचबरोबर संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावात आणि वाडी वस्तीवर नदी, नाले,ओढ्यावर माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी नाला बिल्डिंग व साखळी बंधार्यांदची निर्मिती केली असल्याने जलसमृद्धीचे मोठे काम झाली असल्याचे मालदाड येथील शेतकरी गोरख नवले यांनी म्हटल आहे.



२. कृषी क्षेत्रासाठी योग्य नेतृत्वाची गरज

राज्याच्या प्रगतीमध्ये कृषी क्षेत्रात अत्यंत महत्त्वाची असून या क्षेत्राला माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या सक्षम आणि अनुभवी नेतृत्वाची गरज आहे. त्यांनी प्रत्येक संकटात शेतकऱ्याला तात्काळ मदत उपलब्ध करून दिली. या उलट सध्याचे महायुतीचे मंत्री हे या खात्यातील निधी अभावी त्याला दुय्यम महत्त्व देत असून हा खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा अपमान करत आहे. त्यामुळे या खात्याला महत्त्व प्राप्त करून देण्यासाठी बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या नेतृत्वाची गरज असल्याचे उत्तर महाराष्ट्र शेतकरी संघटनेचे अध्यक्ष तथा चोपडा सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष एस बी पाटील यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *