“सेवेचा मान, समाजाचा सन्मान आणि पर्यावरणाची जपणूक” या भावनेतून महसूल सप्ताहाचे औचित्य साधत दुय्यम निबंधक कार्यालय, श्रीगोंदा येथे विविध सामाजिक व सेवा उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात सेवानिवृत्त कर्मचारी, माजी सैनिक, दिव्यांग व्यक्ती तसेच समाजकार्यात मोलाचे योगदान देणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यासोबतच सलोखा योजना अंतर्गत लाभ वितरण आणि वृक्षारोपण उपक्रमाने कार्यक्रमाला बहार आली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी प्रभारी दुय्यम निबंधक श्री. जी. व्ही. तारगे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. यानंतर सेवानिवृत्त कर्मचारी श्री. विलास जगन्नाथ महाजन यांच्या दीर्घ सेवेतून केलेल्या कार्याची उजळणी करून त्यांना शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. त्यानंतर माजी सैनिक प्रकाश चव्हाण, नवनाथ खामकर, परमेश्वर घोडके आणि दिव्यांग व्यक्ती नारायण शिरसागर यांचा देखील सन्मान करण्यात आला. उपस्थितांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्याकडून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले.
या वेळी महसूल सप्ताहातील महत्त्वाचा उपक्रम म्हणून सलोखा योजना अंतर्गत सूची क्रमांक दोन प्रदान करण्यात आली. या योजनेंतर्गत जमिनीवरील वाद मिटवून परस्पर सहमतीने नोंदी अद्ययावत करण्याचा उद्देश साधला जातो. लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ दिल्याबद्दल महसूल प्रशासनाचे आभार मानले.
समाजकार्यासोबत पर्यावरण संवर्धनावर भर देत दिनांक ६ ऑगस्ट रोजी कार्यालय आवारात वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या वृक्षारोपणात कार्यालयातील सर्व कर्मचारी, अधिकारी आणि मान्यवरांनी उत्साहाने सहभाग घेतला.
संपूर्ण कार्यक्रमात प्रभारी दुय्यम निबंधक श्री. जी. व्ही. तारगे, लिपिक ओम प्रकाश अभंग, ऑपरेटर दीपक माने, कर्मचारी मंगल टकले तसेच कार्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ओम प्रकाश अभंग यांनी केले तर आभार प्रदर्शन दीपक माने यांनी केले. महसूल सप्ताहानिमित्त झालेल्या या उपक्रमांमधून समाजासाठी कार्य करणाऱ्यांचा गौरव, नागरिकांमध्ये सलोखा निर्माण करण्याचा प्रयत्न आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश असा त्रिसूत्री उद्देश यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आला.
(प्रतिनिधी – गणेश कविटकर)



