संगमनेरच्या राजकीय आणि सामाजिक पटलावर जेव्हा एखाद्या कर्तृत्ववान नेतृत्वाचा उल्लेख होतो तेव्हा डॉ. मैथिली सत्यजीत तांबे हे नाव आदराने घेतले जाते. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या आतापर्यंतच्या प्रवासाचा आढावा घेताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे-संवेदनशीलता आणि शिस्त. यांचा संगम लाभलेले हे नेतृत्व संगमनेरच्या विकासाला नवी दिशा देत आहे.

चेन्नईच्या मातीत जन्म झाला असला तरी, सांगलीच्या खानापूर तालुक्यातील मातीची ओढ त्यांच्या रक्तात आहे. तामिळ, मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा भाषांच्या संगमातून त्यांना जे बहुभाषिक व्यक्तिमत्व लाभले त्यामुळेच त्यांना समाजाच्या विविध स्तरांतील लोकांशी संवाद साधणे सहज शक्य झाले. पण हा केवळ संवाद नव्हता तर ती नाती जोडण्याची एक कला होती.
डॉक्टर (BDS) म्हणून रुग्णांच्या वेदना समजून घेण्याचे कसब त्यांनी आत्मसात केले. मात्र, केवळ क्लिनिकपुरते मर्यादित न राहता, समाजातील मोठ्या व्यवस्थेत बदल घडवण्यासाठी त्यांनी शिक्षणाची कास धरली. ‘सिम्बायोसिस’ मधून MBA आणि ‘हार्वर्ड बिझनेस स्कूल’सारख्या जागतिक दर्जाच्या संस्थेतून नेतृत्व गुणांचे धडे गिरवले. पुण्यातील ‘TAS School’ मध्ये CEO म्हणून काम करताना त्यांनी राबवलेली ‘प्रणाली- आधारित कामकाज’ पद्धती ही त्यांच्या प्रगल्भ विचारांची साक्ष देते.
स्वातंत्र्यसैनिक स्व.भाऊसाहेब थोरात यांचा त्यागी वारसा, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉ.सुधीर तांबे यांची संयमी वृत्ती आणि माजी नगराध्यक्षा सौमी दुर्गाताई तांबे यांची प्रशासकीय पकड अशा दिग्गज नेतृत्वांचे मार्गदर्शन मैथिलीताईंना लाभले. सत्यजीत तांबे यांच्यासोबतच्या सहजीवनातून त्यांना राजकारण हे सत्तेचे माध्यम नसून समाजसेवेचे साधन असल्याची प्रचिती आली.
‘I Love Sangamner’ आणि ‘जयहिंद लोकचळवळ’ या माध्यमातून त्यांनी महिलांचे बचत गट, युवकांचे कौशल्य आणि बालकांचे भविष्य घडवण्यासाठी जे काम केले, त्यातूनच खऱ्या अर्थाने त्या जनसामान्यांच्या “मैथिलीताई” झाल्या.
आज संगमनेरच्या नगराध्यक्षा म्हणून काम करताना त्यांच्यातली ‘डॉक्टर’ संवेदनशीलता जपते तर ‘मॅनेजर’ कामाची गती आणि अचूकता पाहते. त्यांचे स्वप्न केवळ रस्ते आणि इमारतींचे शहर उभारणे नाही तर एक ‘नागरिककेंद्रित आणि तंत्रज्ञानस्नेही’ संगमनेर घडवणे हे आहे. स्वच्छता, महिला सुरक्षा आणि युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी त्या अहोरात्र झटत आहेत.
“हा प्रवास पद किंवा प्रतिष्ठेचा नसून तो एका विश्वासाचा आहे जो संगमनेरच्या जनतेने माझ्यावर टाकला आहे” असे त्या जेव्हा म्हणतात तेव्हा त्यातील प्रामाणिकपणा काळजाला भिडतो.
आज वाढदिवसानिमित्त मैथिलीताईंना उदंड आयुष्य लाभो, हीच सदिच्छा! त्यांच्या रूपाने संगमनेरला लाभलेले हे सुशिक्षित आणि दूरदृष्टीचे नेतृत्व शहराला प्रगतीच्या शिखरावर नेईल, यात शंका नाही !
- समीर कडलग



