- मागासवर्गीय मुलांच्या वस्तीगृहासाठी जागा देण्याची आमदार खताळ यांची मागणी
संगमनेर नगरपरिषद हद्दीतील दिल्ली नाका परिसरातील जुना बैल बाजार व नाटकीनाला येथील शासकीय जागेवरील अतिक्रमणाचा प्रश्न आमदार अमोल खताळ यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित करत राज्य सरकारचे लक्ष वेधले. सदर जागेवरील अतिक्रमण हटवून त्या ठिकाणी मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृह उभारण्यात यावे, यासाठी ती जागा देण्यात यावी अशी मागणी आमदार खताळ यांनी विधीमंडळात केली.

संगमनेर शहरातील दिल्ली नाका, जुना बैल बाजार येथील सर्वे नंबर 816 (सिटी सर्वे नंबर 1649, नवीन 209) मधील सुमारे 1.26 हेक्टर क्षेत्र नगरपरिषद मालकीचे असल्याचे नगर विकास व सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आपल्या उत्तरात स्पष्ट केले.
या परिसरात नाटकीनाला व प्रवरा नदीलगत असल्यामुळे 1975 च्या पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे त्या वेळी येथील नागरिकांचे अन्य ठिकाणी पुनर्वसन करण्यात आले होते. मात्र त्यानंतर नगरपरिषद प्रशासनाने संबंधित जागेचा ताबा घेणे अपेक्षित असतानाही तसे झाले नाही. यामुळे आज या जागेवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले असून गॅरेज, भंगार दुकाने व इतर अवैध व्यवसाय सुरू आहेत. ही बाब अत्यंत गंभीर व चिंताजनक असल्याचे आमदार खताळ यांनी विधिमंडळाच्या निदर्शनास आणून दिले.

सदर जागा नगरपरिषदेच्या मालकीची असल्याचे शासनाने मान्य करूनही अद्यापपर्यंत कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे अतिक्रमण तातडीने हटवून जागा नगरपरिषद ताब्यात घ्यावी, तसेच यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी ठाम मागणी आमदार खताळ यांनी केली. तसेच ही जागा अतिक्रमणमुक्त करून त्या ठिकाणी मागासवर्गीय मुलांसाठी वसतिगृह उभारावे किंवा प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल योजना राबवून गरजूंना पुनर्वसनाचा पर्याय उपलब्ध करून द्यावा, अशीही त्यांनी मागणी केली.
संगमनेर शहरातील दिल्ली नाका व जुना बैल बाजार या ठिकाणच्या अतिक्रमणावर निश्चित कारवाई केली जाईल, असे आश्वासन देत समाज कल्याण केंद्राच्या आरक्षणासाठी ना हरकत दाखला मिळवण्यासाठीचा प्रस्ताव आता थेट टाऊन प्लॅनिंग विभागाकडे सादर करत असल्याचे नगर विकास व सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आमदार अमोल खताळ यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.



