संगमनेर कनिष्ठ महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ
“माझ्या राजकीय जीवनात मला एका निवडणुकीत यश मिळाले तर दुसऱ्या निवडणुकीमध्ये अपयश आले. तरी न थांबता पुढे चालत राहिलो. त्यामुळे तुम्हांला अपयश आले तरी अपयशाने खचून न जाता पुढे मार्गक्रमण करत राहा. एक ना एक दिवस तुम्हांला यश नक्कीच मिळेल,” असा मौलिक सल्ला आमदार अमोल खताळ यांनी दिला.

संगमनेरातील शिक्षण प्रसारक संस्थेच्या श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयामध्ये वार्षिक पारितोषिक वितरण आमदार खताळ यांच्या हस्ते झाले, त्यावेळी आयोजित समारंभात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपणी होते. व्यासपीठावर बांधकाम समितीचे अध्यक्ष संतोष करवा, शालेय समितीचे सदस्य दिलीप सांगळे, मुख्य शिक्षणाधिकारी डॉ. राजेंद्र लढ्ढा, प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड, उपप्राचार्य राजेंद्र ढमक, पर्यवेक्षक प्रा. अप्पासाहेब गुंजाळ, कला मंडळ कार्याध्यक्ष चारुशिला गुजर, प्रा. मारुती कुसमुडे आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार खताळ पुढे म्हणाले, मी ज्या महाविद्यालयात शिक्षण घेतले त्याच महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहता आले हे मी माझे भाग्य समजतो. माझे वडीलही याच महाविद्यालयाचे विद्यार्थी होते. ते कमवा आणि शिका या योजनेतून शिक्षण घेत ते पुढे आले. त्यामुळे सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांनीही शिक्षणाच्या जोरावर मोठी स्वप्ने पाहावीत. अशा कार्यक्रमांमधून विद्यार्थ्यांना शिकण्याची, ऐकण्याची आणि स्वतःला घडविण्याची संधी मिळते.
वार्षिक पारितोषिक वितरण हा केवळ सन्मानाचा कार्यक्रम नसून महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो.
खऱ्याअर्थाने शिक्षकांची जबाबदारी ही विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्याची असते आणि या संस्थेतील शिक्षकांनी ती जबाबदारी अत्यंत चोखपणे पार पाडली आहे. या संस्थेतून शिक्षण घेऊन अनेक विद्यार्थी डॉक्टर, इंजिनिअर, तसेच प्रशासकीय सेवेत विविध क्षेत्रांत यशस्वी झाले तर स्वतःच्या संघर्षशील प्रवासावर बोलताना म्हणाले, संगमनेरमध्ये ज्यावेळी इंटरनेटची सुविधा उपलब्ध नव्हती. त्याकाळात मी स्वतः माझ्या सायबर कॅफेमधून ऑनलाइन फॉर्म, परीक्षा अर्ज भरण्यासाठी विद्यार्थी पालकांना मदत केली आहे. त्यातूनच मला समाजसेवेची दिशा मिळाली. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर माझ्या आई-वडिलांच्या डोळ्यांतील अश्रू मी कधीही विसरू शकत नाही. त्यामुळे कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळवा, मात्र आई-वडिलांची स्वप्ने पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, असा सल्ला आमदार अमोल खताळ यांनी विद्यार्थ्यांना दीला.
सूत्रसंचालन प्रा. ज्ञानेश्वर जेजूरकर, प्रा. भारती कडू, प्रा. संदीप वलवे यांनी केले तर अहवाल वाचन जान्हवी बोडके, सायली तायडे यांनी केले. स्वागतगीत सारिका भोर आणि समूहाने गायले. तर प्रा. वृषाली खांडगे यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
मिर्झापूर येथील अखिलेश वलवे या होतकरू विद्यार्थ्याची इंग्लंडमधील शिक्षणासाठी निवड झाली होती. मात्र त्याची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे शिष्यवृत्तीच्या मंजुरीस विलंब झाला असल्यामुळे त्याच्या शिक्षणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. ही बाब मी आमदार अमोल खताळ यांच्या निदर्शनास आणून दिली. या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदार खताळ यांनी तत्काळ मंत्रालयात स्वतः जाऊन पाठपुरावा केला आणि त्याची शिष्यवृत्ती मंजूर करून दिली. त्यामुळे त्याचा इंग्लंडमधील शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला. ही बाब समाजासाठी प्रेरणादायी असून संगमनेर तालुक्यासाठी अभिमानास्पद असल्याचे डॉ. संजय मालपाणी यांनी सांगितले.



