संगमनेर नगरपालिकेच्या आज पार पडलेल्या पंचवार्षिक निवडणुकीत संगमनेरकर जनतेने दिलेला कौल आम्ही विनम्रपणे स्वीकारत असून शहर विकासाकरीता महायुती सरकारच्या माध्यमातून कटिबध्द राहाण्याची ग्वाही आमदार अमोल खताळ यांनी दिली.

संगमनेर नगरपरिषद या निवडणुकीत शिवसेना–महायुतीच्या वतीने सर्व सामान्य कुटुंबातील उमेदवारांना संधी देत, तळागाळातील कार्यकर्त्यांना सन्मान देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात आला. महायुतीचे सर्व उमेदवार अत्यंत चांगल्या पद्धतीने निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. सर्व सामान्य उमेदवारांनी धनशक्तीच्या आणि दडपशाहीच्या विरोधात चांगली लढत दिली. निवडणुकीचा निकाल जरी अपेक्षेप्रमाणे लागला नसला, तरी आमचे मनोबल कधीही खचणार नाही, असे आमदार खताळ पाटील यांनी स्पष्ट केले.
“माझ्यासारख्या एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलाला या तालुक्यातील सर्वसामान्य जनतेने आमदार म्हणून सेवा करण्याची संधी दिली. त्या विश्वासातूनच शहर आणि तालु क्याच्या विकासाची अनेक कामे मार्गी लागली असून पुढील काळातही विकासाची गती कायम राहील,” असे त्यांनी सांगितले
राजकारणात जय पराजय होत असतो, मात्र निकालानंतर निराश न होता शिवसेना पक्ष प्रमुख तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांना पुन्हा नवचैतन्य मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. निवडणूक ही पूर्णतः कार्यकर्त्यांच्या जीवावरती लढविण्यात आली असून, पक्षस्तरावर निकालाचे आत्मपरीक्षण निश्चित पणे केले जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.या निवडणुकी दरम्यान शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे शिवसेना–भाजप महायुती आपल्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील. प्रचारात कोणतीही कमतरता राहिली नाही, मात्र स्थानिक पातळीवर धन शक्ती, विरुद्ध जनशक्ती अशी लढाई झाली आहे तसेच या निवडणुकीत दादागिरी व दबाव तंत्राचा वापर मोठ्या प्रमाणात झाला हे सूज्ञ मतदारांनी पाहीले असल्याचे आ.खताळ म्हणाले.

शहराच्या सर्वांगीण विकासासाठी भविष्यातही आपली भूमिका सकारात्मक आणि बांधिल राहील, आशी ग्वाही देतानाच निवडणूक प्रक्रियेत सहभागी झालेल्या सर्व मतदार बंधू–भगिनींचे तसेच अहोरात्र मेहनत घेणाऱ्या शिवसेना–महायुती च्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांचे मनःपूर्वक आभार मानले.



