कर्जमुक्त व्हा! पुस्तकाचा प्रकाशन सोहळा

आर्थिक स्वातंत्र्य आणि कर्जमुक्त जीवनाची गुरुकिल्ली शिकवणाऱ्या “कर्जमुक्त व्हा!” या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा काल शनिवारी (८ नोव्हेंबर २०२५) सकाळी ११ वाजता फिरोदिया हॉल, भांडारकर ओरिएंटल रिसर्च इन्स्टिट्यूट, लॉ कॉलेज रस्ता येथे पार पडला. कार्यक्रमाला प्रेक्षकांनी प्रचंड गर्दीनं प्रतिसाद दिला. मधुश्री पब्लिकेशनच्या वतीने प्रकाशित होत असलेल्या या पुस्तकाचे लेखक सीए अभिजीत कोळपकर यांनी कर्जाच्या ओझ्यापासून मुक्त होण्याचे व्यावहारिक मार्ग या पुस्तकात मांडले आहेत.


पुस्तक प्रकाशन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून सतीश मराठे (संचालक – भारतीय रिझर्व्ह बँक, नाबार्ड; संस्थापक – सहकार भारती) उपस्थित होते. तर चितळे उद्योगसमुहाचे श्रीकृष्ण चितळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
“प्रत्येक व्यवसायिकाला कधी न कधी कर्ज घेण्याची गरज पडतेच आणि कर्ज घ्यावं, ते फेडावं पण कर्जबाजारी हो नये. आमच्या काळी बँका कर्ज देत नव्हत्या. पण आता कर्ज घेणं आणि फेडणं दोन्ही सोपं झालं आहे. तेव्हा कर्ज जरुर घ्यावं आणि आपली आर्थिक प्रगती साधावी. प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करताना तो व्यवसायाची वास्तविक स्थिती विचारात घेऊन तयार करावा. क्रेडिट कार्ड उपयोगी जरी असले तरी त्याच्या जाळ्यात अडकून कर्जबाजारी होऊ नये” असं चितळे उद्योगसमुहाचे श्रीकृष्ण चितळे यांनी आपल्या भाषणात सांगितलं.


तर “मी अर्थतज्ज्ञ नाही.” असं म्हणून रिझर्व बँकेचे संचालक श्री. सतिश मराठे यांनी आपल्या मनोगताची सुरुवात केली खरी, पण त्यांनी आपल्या आर्थिक इतिहासापासून ते भविष्याचा अर्थशास्त्रीय आढावा घेतला. आणि “आताची आपली अर्थव्यवस्था विकासाच्या मार्गावर आरुढ झाली असून त्याचा आपण फायदा करुन घेतला पाहिजे असं प्रतिपादन केलं. फिनटेकमुळे लवकरच लघु उद्योजकांना वाजवी दरात कर्ज व विविध सुविधा मिळू शकतील. तरूणांनी नोकरी करत असताना मालमत्ता खरेदी करण्यासाठी आणि व्यवसायिकांनी व्यवसाय वृद्धीसाठी कर्ज घेतलं पाहिजे. कर्ज घेणं, ते फेडणं या चक्रामुळे देशाची आर्थिक चक्रांना गती मिळते. कर्ज घेऊन प्रत्येकाने आपला फायदा करायला हवा. कर्ज मात्र वेळेवरच फेडायला हवे.” असंही ते या कार्यक्रमात म्हणाले.


लेखक सीए अभिजीत कोळपकर यांनी कर्ज आहे प्रत्येकासाठी समान नसते. कौटुंबिक पार्श्वभूमी नसल्यामुळे अनेकांना करिअरच्या सुरुवातीला कर्ज घ्यावेच लागते हे सांगितले. मालमत्ता निर्मितीसाठी कर्ज घेऊन त्याची लवकरात लवकर परतफेड करावी आणि स्वतःचा फायदा करावा असे त्यांनी सांगितले. वेळेत कर्ज फेडणारे व्यवसायिक त्यातून कसे प्रगती करतात किंवा कर्जाचं नीट व्यवस्थापन न केल्यामुळे कसे कर्जबाजारी होतात हे सगळं प्रत्यक्ष पाहीलं असल्यामुळे कर्जाचं अनेक पैलूंनी आकलन झालं आणि अशा अनेक प्रसंगांमुळे कर्जमुक्त व्हा हे पुस्तक लिहायला प्रेरणा मिळाली असं त्यांनी नमूद केलं.
प्रकाशक शरद अष्टेकर यांनी “आतापर्यंत आम्ही परदेशी लेखकांची ३५० पुस्तकं मराठीत आणली, पण सीए कोळपकरांचं पहिलं पुस्तक अर्थसाक्षर व्हा हे आमचं मूळ मराठी पुस्तक आज इंग्लिश, हिंदी, गुजराती, पंजाबी, आणि अरेबिक अश्या अनेक भाषांमधे गेलेलं पहिलं पुस्तक आहे. त्याचा आम्हाला अभिमान आहे आणि कर्जमुक्त व्हा हेही पुस्तक असंच यश मिळवेल अशी आम्हाला खात्री आहे.” असं सांगितलं.


या पुस्तकाचं संपादन करणाऱ्या अमृता देशपांडे यांनी या कार्यक्रमाचं प्रास्तविक केलं. ते करताना त्यांनी लेखकानं यावर घेतलेली मेहनत आणि नंतर केलेले संपादकीय संस्कार उलगडून दाखवले. तर सवीता म्हसकर यांनी कार्यक्रमाचं उस्फूर्त सूत्रसंचालन केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *