संगमनेर मर्चंट्स बँक नाशिकमध्येही मोठे यश मिळवेल – विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम

दहाव्या शाखेचे नाशिक मध्ये दिमाखात उद्घाटन संपन्न !

‘तब्बल साठ वर्षे लोकांचा विश्वास संपादन केल्यानंतर भक्कम आर्थिक स्थितीतील संगमनेर मर्चंट्स बँकेने नाशिक मध्ये दिमाखात पाऊल ठेवले आहे. लोकाभिमुख पारदर्शक कारभार आणि राजेश मालपाणी यांचे सर्वसमावेशक समर्थ नेतृत्त्व यामुळे बँक नाशिक मध्ये मोठे यश मिळवेल’ असा विश्वास भारतीय प्रशासन सेवेतील ज्येष्ठ अधिकारी नाशिकचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी व्यक्त केला.


हीरक महोत्सवी वर्षानिमित्त श्री गेडाम यांच्या हस्ते संगमनेर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेच्या दहाव्या शाखेचा शुभारंभ नाशिक येथे संपन्न झाला. त्यावेळी उद्घाटनपर भाषणात त्यांनी वरील विश्वास व्यक्त केला. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून आयकर विभागाचे अतिरिक्त आयुक्त भरत आंधळे, मराठा विद्या प्रसारक मंडळ नाशिकचे सरचिटणीस नितीन ठाकरे, विश्वास ग्रुप चे कुटुंब प्रमुख विश्वास ठाकूर, बँकेचे चेअरमन राजेश मालपाणी यांच्यासह व्हाईस चेअरमन मधुसूदन नावंदर, तज्ञ संचालक सीए संजय राठी, रवींद्र पवार, महेश डंग, मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष देसाई इत्यादी मान्यवर उपस्थित होते.


श्री गेडाम आपल्या भाषणात पुढे म्हणाले की ‘नाशिक मधील पदार्पणामुळे संस्थेच्या शाखांची दोन अंकी गौरवास्पद वाटचाल सुरू झाली आहे. ही प्रगती थांबणारी नाही. कोणत्याही परिसराची, प्रदेशाची समृद्धी ही उद्योग व्यवसायातून येते. त्यासाठी सर्वप्रथम भांडवल उभे करण्यासाठी मिळणारी मदत आणि महत्त्वपूर्ण मार्गदर्शन संस्था साठ वर्षे करीत आहे. ज्याप्रमाणे संगमनेरच्या आर्थिक समृद्धीमध्ये मर्चंट बँकेचे अभूतपूर्व योगदान दिले तशीच किमया तसेच आता नाशिकच्या बाबतीतही घडेल असा विश्वास आहे”


प्रमुख अतिथी आयकर विभागाचे अतिरिक्त आयुक्त भरत आंधळे म्हणाले की “नाशिककरांना संगमनेर मर्चंट च्या वेगवान अत्याधुनिक सेवेचा लाभ मिळेल . उद्योगपती राजेश मालपाणी यांच्या रूपाने अभ्यासू आणि प्रगल्भ’ विकासाभिमुख नेतृत्व मर्चंट बँकेला लाभले. जिद्द, मेहनत, अपार कष्टाची तयारी, पारदर्शकता, सचोटी, प्रामाणिकपणा सर्वांना सोबत घेऊन चालण्याची वृत्ती ही त्यांची वैशिष्ट्ये आहेत. मालपाणी आणि पारदर्शकता हे समानार्थी शब्द आहेत. त्याचेच प्रतिबिंब संगमनेर मर्चंट बँकेच्या प्रगतीतून दिसून येत आहे . सध्या बँकेचे क्षेत्र देखील स्पर्धेचे झालेले आहे. मात्र निकोप स्पर्धा जिंकण्याची क्षमता राजेश मालपाणी यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी विकसित केली आहे. त्यामुळे त्यांची पावले सतत पुढे पडत आहेत समाजाचे ऋण मानणारा आणि सामाजिक बांधिलकी साठी स्वतःला वाहून घेणारा असा हा एक विचारांचा संघ असून राजेश मालपाणी त्याचे कॅप्टन आहेत”


मराठा विद्या प्रसारक संस्थेचे सरचिटणीस नितीन ठाकरे म्हणाले “ नाशिक म्हणजे अत्यंत सुंदर आणि समृद्ध असलेल्या भौगोलिक सुवर्ण त्रिकोणातील केंद्रबिंदू आहे. मुंबई पुणे यांच्या विस्ताराला आता मर्यादा पडायला लागल्यामुळे नाशिकचे भविष्य उज्वल आहे. नाशिकला अजूनही सर्व दृष्टीने मोठा वाव आहे.”


विश्वास ग्रुपचे अध्यक्ष विश्वास ठाकूर म्हणाले की, देशातील सर्व महत्त्वाच्या बँकांच्या शाखा आज नाशिक शहरात आहेत आणि त्यामध्ये संगमनेर मर्चंट बँकेने आपली शाखा उघडणे हा नक्कीच अभिमानाचा आणि कौतुकाचा विषय आहे. साठ वर्षे अनेकांना जीवनामध्ये उभे करण्याचे बँक संगमनेर मर्चंट्स बँकेने करून सर्वांचा विश्वास जिंकला आहे. ”


बँकेचे चेअरमन मालपाणी आपल्या भाषणात म्हणाले की, “आजचा दिवस म्हणजे संगमनेर मर्चंट बँकेच्या इतिहासातील एक सुवर्णक्षण म्हणावा लागेल. बँकेची जिल्ह्याच्या ठिकाणी आज ही पहिलीच शाखा होत आहे. आजवरच्या 9 शाखा तालुक्याच्या ठिकाणी झाल्या. आज ही दहावी शाखा नाशिकला झाली आहे. दहा या अंकाचे महात्म्य सांगतांना त्यांनी दशावतार, दश दिशा , दशेंद्रिये, दशहरा, श्रीमद्‌ भागवतातील दशम स्कंध असे विविध दाखले देत 10 हा अंक परिपूर्णता, विजय, विस्तार आणि दैवी पूर्णत्वाचं प्रतीक असल्याचे सांगितले. नाशिक ही भगवान श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी – रामचंद्र शब्दातही 10 इंग्रजी अद्याक्षरे आहेत. बँकेची ही दहावी शाखा ही फक्त संख्या नसून, बँकेच्या पूर्णत्वाची आणि नवनव्या प्रगतीच्या वाटचालीची सुरूवात आहे असे ते म्हणाले. बँकेची साठ वर्षांपूर्वी पू. भाऊ ओंकारनाथजी मालपाणी व त्यांच्या सहकार्‍यांनी केलेली स्थापना, वाटचाल, पुरस्कार, आणि शिस्त व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांचा केलेला प्रभावी उपयोग यांचा सविस्तर आढावा घेतला. आज बँक 840 कोटींच्या आसपास व्यवसाय करीत आहे असे ते म्हणाले.

बँकेचे व्हाईस चेअरमन मधुसूदन नावंदर यांनीही छोटेसे परंतु अत्यंत प्रभावी मनोगत व्यक्त करून आभारप्रदर्शन केले. श्री गेडाम यांचा परिचय संतोष करवा यांनी तर सत्कार राजेश मालपाणी यांच्या हस्ते करण्यात आला. ठाकरे यांचा परिचय सीए. प्रवीण दिड्डी यांनी तर सत्कार व्हा. चेअरमन मधुसूदन नावंदर यांच्या हस्ते करण्यात आला. श्री. आंधळे यांचा परिचय सम्राट भंडारी यांनी तर सत्कार सीए संजय राठी यांच्या हस्ते करण्यात आला. श्री. ठाकूर यांचा परिचय सौ. कीर्ती करवा यांनी तर सत्कार रवींद्र पवार व महेश डंग यांच्या हस्ते करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.जितेंद्र पाटील यांनी केले. कार्यक्रमास बँकेचे संचालक सर्वश्री राजेंद्र वाकचौरे, प्रकाश राठी, संदीप जाजू, प्रकाश कलंत्री, मुकेश कोठारी, वैभव दिवेकर , शाम भडांगे, जुगल बाहेती, श्रीगोपाल पडतानी, सौ. उषा नावंदर यांच्यासह नाशिक व संगमनेर मधील उद्योजक, व्यापारी, नाशिक मधील विविध बँकांचे पदाधिकारी, बँकेचे माजी संचालक, माजी चेअरमन, आप्तेष्ट, मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *