जुन्या पिढीतील रील स्टार हरपला : श्रीगोंदा तालुक्यातील गव्हाणेवाडीच्या रामभाऊंचे निधन
श्रीगोंदा तालुक्यातील गव्हाणेवाडी गावचे आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या मनाचा ताबा घेणारे जुन्या पिढीतील रील स्टार रामभाऊ गेणू साळुंके (वय ८२) यांचे शुक्रवार, दि. ५ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ८.३० वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने केवळ गव्हाणेवाडीच नव्हे तर महाराष्ट्रभर शोककळा पसरली आहे.

हातात काठी, अंगावर धोतर-बंडी, डोक्यावर फेटा आणि संथ चाल अशी त्यांची आगळीवेगळी शैली… त्यातल्या त्यात योग्य क्षणी उच्चारलेले गमतीदार शब्द यामुळे ते सर्वांच्या हृदयात कायमचे घर करून गेले होते. साधेपणातला तो अनोखा अभिनय प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवत असे.
त्यांचा नातू संदीप साळुंके याने त्यांना रील बनवण्याचा सल्ला दिला आणि त्यातूनच ३० मिलियन प्रेक्षकांनी पाहिलेली पहिलीच रील महाराष्ट्रात गाजली. पुढे तर बाबांचे चाहते दिवसेंदिवस वाढत गेले. एका महिन्याच्या आतच त्यांना युट्युबचे प्ले बटण मिळाले. गेल्याच आठवड्यात रांजणगाव गणपती येथे दर्शनाला गेले असता चाहत्यांनी त्यांना वेढून टाकले होते.
१९४३ साली जन्मलेले रामभाऊ यांनी आयुष्यभर कष्ट करून संसार उभा केला. हसतमुख, गोड स्वभाव आणि मनमिळाऊ वृत्तीमुळे ते गावोगावी लाडके झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, एक मुलगी, तीन सुना, एक नातसून व आठ नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचा दशक्रिय विधी रविवार, दि. १४ सप्टेंबर २०२५ रोजी गव्हाणवाडी येथे होणार आहे.आज गावोगावी हसरे क्षण देणारे बाबा कायमचे निघून गेले असले तरी त्यांचे रील्स आणि आठवणी चाहत्यांच्या हृदयात सदैव जिवंत राहतील.
प्रतिनिधी – गणेश कविटकर



