संगमनेरमधील पंजाबी कॉलनीतील नोंदी अन्यायाविरुद्ध आमदार अमोल खताळ यांचा पुढाकार

  • “सिटी सर्व्हे १६५० ई मधील नियंत्रित सत्ताप्रकार ‘ब’ नोंद कमी करण्यासाठी खताळ यांचे महसूलमंत्र्यांकडे निवेदन”, खताळ यांच्या निवेदनावर महसूल मंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद

संगमनेर शहरातील पंजाबी कॉलनी भागात येणाऱ्या सिटी सर्व्हे नं. १६५० ई या मिळकतीवर नियंत्रित “सत्ताप्रकार ब” ही नोंद असून, त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून या भागातील स्थानिक रहिवाशांना शासकीय सुविधा, मालकी हक्क, कायदेशीर व्यवहार, बँक कर्ज, पाणी-जोडणी, नळपट्टी, घरपट्टी यामध्ये गंभीर अडचणींचा सामना करावा लागत आहे. या अन्यायाविरुद्ध स्थानिक नागरिकांनी आमदार अमोल खताळ यांच्याकडे लेखी निवेदन सादर केलं. त्याची तात्काळ दखल घेत आ. खताळ यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे हे प्रकरण मांडत, सदर नियंत्रित “सत्ताप्रकार ब” नोंद रद्द करण्याची विनंती केली आहे.

  • बैठकीचे आदेश देण्याचा मंत्र्यांचा निर्णय

आमदार खताळ यांच्या पाठपुराव्यानंतर महसूल मंत्री बावनकुळे यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून सिटी सर्व्हे नं. १६५० ई वरील नोंदींचा सखोल आढावा घेण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने बैठक घेण्याचे आदेश दिले आहेत. यामुळे पंजाबी कॉलनीतील अनेक कुटुंबांना न्याय मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

  • आमदार अमोल खताळ यांचा ठाम पाठपुरावा

“पंजाबी कॉलनीमधील स्थानिक रहिवासी गेल्या अनेक वर्षांपासून या अन्यायाला सामोरे जात आहेत. सत्ताप्रकार ‘ब’ नोंदीमुळे त्यांना कोणतेही कायदेशीर अधिकार प्राप्त होत नाहीत. मी स्वतः महसूलमंत्र्यांची भेट घेऊन या प्रश्नाची सविस्तर माहिती दिली. त्यांनी या प्रकरणात तातडीने बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे आणि मला खात्री आहे की लवकरच योग्य तो निर्णय घेतला जाईल.” – आ. अमोल खताळ, सदस्य संगमनेर विधानसभा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *