गीतेत मानवजातीच्या कल्याणाचे रहस्य : डॉ. संजय मालपाणी

  • राजस्थान युवक मंडळाचा अमृतमहोत्सव; शेकडोंच्या उपस्थितीत व्याख्यानमालेचा समारोप

विपरीत परिस्थितीतही मनोधैर्य खचू न देता आलेल्या संकटावर मात करण्याचा आणि त्यातून पुरुषार्थ गाजवण्याचा मंत्र देणारी श्रीमद् भगवद्गीता म्हणजे यशस्वी जीवनाची गुरुकिल्लीच आहे. जीवनात कशाचा अंगीकार करावा आणि कशाचा त्याग करावा या विषयीचा अनमोल उपदेश गीतेने दिला आहे. माणसाचे जीवन पाण्यावर उठणार्‍या तरंगाप्रमाणे क्षणभंगुर असते. त्यामुळे ‘मी’ पणाचा, अहंकाराचा त्याग करुन मनाचे समत्त्व कसे साधता येईल याचे मार्गदर्शन गीता करते. भगवद्गीता कोणत्या एका विशिष्ट जाती अथवा धर्मासाठी नसून संपूर्ण विश्वातील मानवजातीच्या कल्याणाचे रहस्य त्यात दडल्याचे प्रतिपादन गीता परिवाराचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष, गीता विशारद डॉ.संजय मालपाणी यांनी केले.

  राजस्थान युवक मंडळाचे अमृतमहोत्सवी स्थापना वर्ष आणि श्रावणमासाचे औचित्य साधून संगमनेरात आयोजित त्रिदिन व्याख्यालेच्या समारोपाचे पुष्प गुंफताना ‘विषादाकडून विवेकाकडे’ अर्थात ‘ज्ञानेश्वरी भावयात्रा’ या विषयावर ते बोलत होते. मंडळाचे अध्यक्ष मनीष मालपाणी, कार्याध्यक्ष सुमीत अट्टल, उपाध्यक्ष सागर मणियार, सचिव कल्पेश मर्दा, कृष्णा आसावा, वेणुगोपाल कलंत्री आदी उपस्थित होते. 

गीतेच्या दुसर्‍या अध्यायातील ‘सांख्ययोगा’चे डॉ.मालपाणी यांच्या अत्यंत सोप्या आणि रसाळ वाणीतून निरुपण श्रवतांना श्रोते अंतर्मूख झाले होते. माणसाच्या जीवनात विषादरुपी दुःख वेगवेगळ्या कारणांनी येतच असते. ज्याच्या वाट्याला दुःखच आले नाही, अशी व्यक्ति या भूतलावर नसल्याचे सांगत त्यांनी दुःखाला कवटाळून बसल्याने माणसाच्या जीवनावर त्याचा अनिष्ट परिणाम होत असल्याचे सांगितले. ज्यावेळी प्रगती प्रगती खुंटते, जगणे निरर्थक वाटू लागते अशा गोंधळलेल्या मानसिक अवस्थेत न डगमगता स्वतःला सावरुन जीवनाचे सार्थक कसे करावे याचे सखोल मार्गदर्शन गीता करते. याच बळावर विषादावर मात करण्यासाठी श्रीमद् भगवद्गीता आपल्याला मार्गदर्शन करते. त्यातून मिळालेल्या उभारीवर, उमेदीवर प्रत्येक व्यक्ती आपल्या जन्माचे आणि आयुष्याचे सार्थक करु शकते असेही डॉ.मालपाणी यांनी यावेळी बोलताना सांगितले.

आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुमित अट्टल यांनी केले. कार्यक्रमाच्या अखेरीस ध्रुव ग्लोबल स्कूलच्या योगासनपटूंनी शिवतांडव स्तोत्राच्या तालावर कठीण आसनांचे लक्षवेधी प्रात्यक्षिक सादर करुन उपस्थितांची वाहवा मिळवली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *