- मानधन रोखले, महिलेशी गैरवर्तन; जाब विचारायला गेलेल्या शरद नानांवरही दगड उगारला
- संतापलेल्या तरुणांनी नंदलाल कोकाटेला दिला चोप
संगमनेर तालुक्यात अधिकाऱ्यांची अरेरावी आणि दबावतंत्र वाढत चालले आहे. एका विशिष्ट राजकीय गटाच्या कार्यकर्त्यांच्या कामांना प्राधान्य देणे आणि तालुक्यातील राजकारणाचा भाग बनणे, असा प्रकार काही अधिकाऱ्यांमध्ये सर्रास पाहायला मिळतो. आज या राजकीय दबावाचा कडेलोट झाला आणि उर्मट व उद्धट वागणाऱ्या पंचायत समितीच्या तालुका अभियान व्यवस्थापक नंदलाल कोकाटे याला संतापलेल्या तरुणांनी चोप दिला.

सविस्तर हकीकत अशी की, बचत गटांच्या माध्यमातून तालुकाभर महिला सक्षमीकरणाचे काम करणाऱ्या सीआरपी आणि बचत गट चालकांना विधानसभा निवडणुकीनंतर राजकीय दबाव सहन करावा लागत आहे. विद्यमान आमदारांच्या कार्यक्रमांना हजेरी लावणे, तसेच कार्यालयात अधिकाऱ्यांकडूनही चुकीची वागणूक दिली जाते. या विरोधात जाब विचारल्यास अधिकाऱ्यांकडून उर्मट आणि उद्धट वर्तन केले जाते.
शेडगाव येथील सीआरपी शीतल उगलमुगले यांचे मानधन जाणीवपूर्वक रोखून धरण्यात आले. या संदर्भात त्यांनी वारंवार पूर्ण मानधनाची मागणी केली; मात्र त्याकडे सपशेल दुर्लक्ष करण्यात आले. याउलट, अभियानाचा तालुका व्यवस्थापक नंदलाल कोकाटे यांनी उगलमुगले यांच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केला आणि लज्जास्पद शब्दांचाही वापर केला.
यानंतर उगलमुगले यांनी एका कार्यक्रमात भेटलेल्या शरद नाना थोरात यांना आपली कैफियत सांगितली. त्यावर शरद नाना थोरात तात्काळ पंचायत समितीत जाऊन कोकाटे यांच्याशी बोलले. मात्र, तोडगा काढण्याऐवजी कोकाटे यांनी शरद नानांना शिवीगाळ केली आणि “तुला काय उपटायचे ते उपट” अशी भाषा वापरली. हा सर्व प्रकार रस्त्यावरच घडला. शरद नाना थोरात यांनी संयम राखत त्यांना भाषेला आवर घालण्यास सांगितले. त्यावर संबंधित अधिकाऱ्याने रस्त्यावरचा दगड उचलून नानांवर उगारला.
नाना शांतपणे तिथून निघून गेले; मात्र हा प्रकार कार्यकर्त्यांना समजताच त्यांनी थेट पंचायत समिती गाठली आणि त्या अधिकाऱ्याला जाब विचारला. तरीही कोकाटेची मग्रुरी कमी झाली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या जमावाने कोकाटेला चोप दिल्याची माहिती आहे.

या संदर्भात नंदलाल कोकाटे यांनी शरद नाना थोरात, अभिषेक थोरात, ऋषिकेश थोरात, अक्षय भालेराव, शिवमत भोकरे आणि इतर चार ते पाच जणांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे. तर शीतल उगलमुगले यांनी देखील नंदलाल कोकाटे या अधिकाऱ्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे।
पंचायत समितीच्या कामकाजाबाबत वाढत्या तक्रारी
संगमनेर पंचायत समितीबाबत तक्रारी वाढत आहेत. पंचायत समिती हा राजकारणाचा अड्डा बनला असून, सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर अधिकारी काम करतात. ग्रामपंचायत, आशा सेविका, अंगणवाडी सेविका आणि बचत गटांना मोठ्या प्रमाणावर त्रास दिला जात असल्याचे समोर येत आहे.
शरद नाना स्वतःहून पोलिसांत हजर
एका वंजारी समाजातील महिलेला अधिकारी जाणीवपूर्वक त्रास देत होते, त्यातून हा प्रकार घडला. एखाद्या महिलेच्या पाठीशी उभे राहणे हा गुन्हा आहे का? गुन्हा दाखल झाल्यानंतर शरद नाना थोरात स्वतःहून पोलिसांत हजर झाले.
फिर्याद दाखल करून घेण्यास टाळाटाळ ,पोलिसांवर प्रचंड दबाव
पंचायत समितीच्या माध्यमातून सातत्याने अंगणवाडी सेविका, आशा सेविका याचबरोबर सीआरपी यांना दबावात ठेवून विविध कार्यक्रमांना हजेरी लावण्याबरोबर राजकीय कार्यक्रमांसाठी त्यांचा वापर केला जात आहे. विविध प्रकाराबाबत दाद मागण्याकरता सीआरपी शितल उगलमुगले यांची पोलीस प्रशासनाने तक्रार दाखल करून घेण्यास खूप टाळाटाळ केली .विद्यमान सत्ताधाऱ्यांनी पोलिसांवर मोठा दबाव टाकला असून यामुळे सर्वसामान्य महिला व नागरिकांचे तालुक्यात मोठे हाल होत आहे.
पंचायत समिती राजकारणाचा अड्डा
अंगणवाडी सेविका, आशा सेविका, शिक्षिका व शासकीय कर्मचारी यांना विविध राजकीय कार्यक्रमांना उपस्थिती लावण्याबरोबर सत्ताधारी व त्यांच्या पत्नी यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याबरोबर त्यांच्याच उपस्थितीत कार्यक्रम झाला पाहिजे हा दबाव आहे. सर्वसामान्यांची कोणतेही काम याठिकाणी होत नसून सध्या पंचायत समिती हा सध्या राजकारणाचा अड्डा झाले असल्याची सर्वत्र तालुक्यात मोठी चर्चा आहे.



