हिंदू समाज व शिवसेना-भाजपा महायुती संगमनेर विधानसभा यांच्यावतीने गुरुवारी (दि.१९) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येणार असून शहरातून मिरवणूकही काढण्यात येणार आहे.

शिवजन्मोत्सवाची सुरुवात सकाळी साडेसहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे शिवपूजनाने होणार आहे. त्यानंतर दुपारी ४ वाजता संगमनेर नगरपरिषद येथून मिरवणुकीला प्रारंभ होईल.
ही मिरवणूक लालबहादूर शास्त्री चौक, कॅप्टन लक्ष्मी चौक, रंगार गल्ली, चंद्रशेखर चौक, नेहरू चौक, तेलीखुंट, सय्यद बाबा चौक, मेनरोड, चावडी, अशोक चौक मार्गे पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज स्मारक येथे येऊन समाप्त होणार आहे.
मिरवणुकीची खास आकर्षणे म्हणून सनई-चौघडे, अश्व दर्शन, वारकरी, रामराज्य प्रेरणा रथ, संकटमोचक हनुमान रथ, ढोलीबाजा, जोगेश्वरी बिट्स मुंबई, छावा ढोल पथक, शिवछत्रपती गौरव पालखी, हिंदवी स्वराज्य विजयरथ, डीजे प्लस छावा शौर्यरथ तसेच गोमाता संरक्षण रथ यांचा समावेश असणार आहे. तरी या शिवजन्मोत्सव सोहळा व मिरवणुकीत संगमनेरकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन शिवसेना-भाजपा महायुतीच्यावतीने करण्यात आले आहे.



