संगमनेर शहराचे वैभव असलेले आणि राज्यात एअरपोर्ट म्हणून गौरवपूर्ण उल्लेख होणारे संगमनेरचे बस स्थानक मागील एक वर्षापासून अनाधिकृत फ्लेक्सबाजीच्या विळख्यात झाकाळून गेले होते. याबाबत शहरातील नागरिकांनी अनेक वेळा मागणी करूनही फ्लेक्स काढले जात नव्हते. मात्र आज सर्व फ्लेक्स निघाल्याने तब्बल एक वर्षानंतर संगमनेर हायटेक बसस्थानकाने मोकळा श्वास घेतला आहे.

संगमनेर शहराच्या मध्यवर्ती लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून राज्याला आदर्शवत अशी हायटेक बसस्थानक उभारले आहे. हे बस स्थानक शहराची ओळख ठरली. राज्यभरातील प्रवासी संगमनेरला आल्यानंतर या बस स्थानकाचा एअरपोर्ट असा गौरवपूर्ण उल्लेख करत आहे. बस स्थानकामधील प्रशस्त जागा, शॉपिंग कॉम्प्लेक्स, आधुनिक इमारत, याचबरोबर आकर्षक प्रवेशद्वार यामुळे हे बस स्थानक तरुणांचे सेल्फी पॉइंट सुद्धा ठरले आहे.
मात्र मागील एक वर्षापासून या बस स्थानकाला अनाधिकृत फ्लेक्स चा विळखा पडला होता. सर्व बस स्थानक झाकले गेले होते. याबाबत व्यापारी व नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी केल्या होत्या. मात्र तरीही फ्लेक्स काढले जात नव्हते. संगमनेर शहरात फ्लेक्सबाजी सुरू झाली होती. नागरिकांनी आंदोलनाचा इशाराही दिला होता मात्र नगरपालिका प्रशासनाने यावर कोणतीही कारवाई केली नाही.
अनेकदा कमानीमुळे वाहतुकीमध्ये अडथळे निर्माण झाले अपघातांचे प्रमाण वाढले. फ्लेक्समुळे समोरून येणाऱ्या वाहनांच्या अपघाताचे प्रमाण वाढत होते. सिग्नल वरही फ्लेक्स असल्याने सिग्नल व्यवस्था कळत नव्हती अशी दुरावस्था सर्वत्र झाली होती.
यानंतर आमदार सत्यजित तांबे यांच्या पुढाकारातून त्यांच्या कार्यकर्त्यांनी लावलेले सर्व फ्लेक्स स्वतः आमदार सत्यजित तांबे यांनी काढून एक आदर्श निर्माण केला. मा.महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे मंत्रीपदी असताना त्यांनी बस स्थानकासमोर स्वतः उभे राहून स्वतःचे सर्व फ्लेक्स काढून येथे फ्लेक्स बाजी करू नये असे आव्हान केले होते याचबरोबर हे उत्तम आणि आदर्श उदाहरण राज्यातील राजकीय नेत्यांसाठी निर्माण केले होते याचा आदर्श घेऊन आमदार सत्यजित तांबे यांनी आपले फ्लेक्स काढून घेतले.


मात्र तरीही काही राजकीय पक्षांच्या पुढार्यांनी आणखी फ्लेक्स बाजी सुरू केली. यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या मनात चिड निर्माण झाली. वारंवार निवेदने देऊन मागणी करूनही फ्लेक्स काढले जात नव्हते त्यामुळे हायटेक बस स्थानक झाकले होते. मात्र नगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने रातोरात सर्व फ्लेक्स निघाल्याने आता संगमनेर बस स्थानकाने मोकळा श्वास घेतला असून व्यापारी वर्ग ही सुखावला आहे.
याचबरोबर सर्वसामान्य नागरिकांनाही याचा आनंद झाला आहे तर महाविद्यालयीन तरुणांनी याबाबत अत्यंत समाधान व्यक्त केले आहे. अनेक दिवसांनी संगमनेर बस स्थानक पाहायला मिळाले असे अनेक विद्यार्थ्यांनी सांगितले.
फ्लेक्सबाजीच्या मुक्तीमुळे बस स्थानकाचे सौंदर्य वाढले
संगमनेर बस स्थानक हे आम्हा महाविद्यालय मुलांसाठी अत्यंत आनंदाचे आहे. आपल्या शहरांमध्ये इतके मोठे बस स्थानक आहे याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे मात्र मागील एक वर्षापासून ते बस स्थानक दिसत नव्हते आता मोकळे झाल्याने सेल्फी टाकून आम्ही संगमनेरकर असल्याचा अभिमान बाळगत आहोत.
प्रांजली खेमनर – अंभोरे विद्यार्थिनी, तनुजा सोनवणे – चिंचोली गुरव विद्यार्थिनी



