संगमनेर विधानसभा मतदारसंघातील मुलांना आधुनिक, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने आमदार अमोल खताळ यांनी केलेल्या मागणीला आज मोठे यश मिळाले आहे. राज्यसरकार कडून संगमनेर तालुक्यात स्वमालकीच्या ४२ अंगणवाड्यांचा “स्मार्ट अंगणवाडी” योजनेत समावेश करण्यात आला असल्याची माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली.

महिला व बाल विकास विभागाने संपूर्ण राज्यातील ५,४६९ अंगणवाड्यांना “स्मार्ट अंगणवाडी किट उपलब्ध करून देण्यास मंजुरी दिली असून, या निर्णयात संगमनेर मतदारसंघातील ४२ अंगणवाड्यांचा समावेश असल्यामुळे संगमनेर तालुक्या तील पूर्व प्राथमिक शिक्षण वबालविकास क्षेत्रात मोठे पाऊल उचलले गेले आहे. संगमनेरमध्ये वाढत्या लोकसंख्येनुसार अंगणवाड्यां सुविधांचे आधुनिकीकरण होणे अत्यावश्यक होते. या किटमुळे स्थानिक अंगणवाड्यांमध्ये मुलांसाठी सुरक्षित शैक्षणिक वातावरण निर्माण होईल.
“ स्मार्ट अंगणवाडी किट”मध्ये मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यात शिक्षण साहित्य, कौशल्य विकास साधने, आरोग्य व पोषणाशी संबंधित साहित्य, मुलांच्या अंगभूत कुतूहलाला चालना देणारे खेळणी व दृश्य-श्राव्य साधने समाविष्ट आहेत. यामुळे संगमनेरमधील मुलांना मोठ्या शहरांमध्ये मिळणाऱ्या समकक्ष सुविधा उपलब्ध होणार असून ग्रामीण भागातही आधुनिक शिक्षण संस्कृती रुजण्यास मदत होईल.या योजनेच्याअंमलबजावणी मध्ये पारदर्शकता व गुणवत्ता तपासणी वर विशेष भर देण्यात आला असून पात्र अंगणवाड्यांची यादी निश्चित करून त्या केंद्रांमध्ये किटचे वितरण केले जाणार आहे. पुरवठ्याची नोंदवही, साहित्याची गुणवत्ता व उपलब्धता याची तपासणी बाल विकास प्रकल्प अधिकाऱ्यांमार्फत केली जाईल. त्यासोबतच प्रत्येक केंद्रात हे साहित्य नियमित वापरले जाईल यासाठी मार्गदर्शक सूचना दिल्या जातील.
संगमनेर तालुक्यातील अनेक अंगणवाड्या पूर्वीपासूनच चांगले कार्य करीत असल्या तरी शिक्षण, पोषण व आरोग्य सुविधा सक्षम करण्यासाठी आधुनिक साधनांची आवश्यकता होती. या निर्णयामुळे अंगणवाड्यांची पायाभूत सुविधा मजबूत होईल, मुलांमध्ये शिकण्याची उत्सुकता वाढेल, तसेच केंद्रांमध्ये कौशल्य प्रशिक्षणाचे कार्यक्रम राबविणे सोपे होईल. विशेषतः ग्रामीण व आदिवासी भागातील मुलांना याचा मोठा फायदा होईल.
“संगमनेरमधील मुलांचे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी सक्षम शिक्षण व पोषण सुविधा देणे ही काळाची गरज आहे. ‘स्मार्ट अंगणवाडी किट’ उपलब्ध झाल्या मुळे आपल्या केंद्रांमध्ये आधुनिक सोयी निर्माण होतील आणि मुलांसाठी शिकण्याची प्रक्रिया अधिक आनंददायी बनेल. संगमनेरच्या विकासासाठी ही अत्यंत महत्त्वाची पायरी आहे. याबद्दल महिला व बाल विकास विभागाचे मनःपूर्वक आभार.संगमनेरमध्ये बाल विकास क्षेत्रातील गुणवत्ता आणखी उंचावण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत राहू.”
या निर्णयामुळे संगमनेरमध्ये “आदर्श अंगणवाडी” ही संकल्पना प्रत्यक्षात उतरून येथील मुलांच्या बालपणाला, शिक्षणाला व आरोग्याला सकारात्मक गती मिळणार आहे. शिक्षण व पोषण यांचा योग्य समन्वय साधत संगमनेर तालुका बालविकास क्षेत्रात आदर्श ठरेल.आमदार अमोल खताळ यांनी या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्य मंत्री अजित पवार , महिला, बालविकास मंत्री आदितीताई तटकरे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे आभार मानले आहेत.
स्मार्ट अंगणवाडीमध्ये समाविष्ट असलेली संगमनेर मधील प्रमुख केंद्रे
धांदरफळ खुर्द, माणकेश्वर मळा, गोडसेवाडी, मिर्झापुर, उबरमळा, खटकाळी, दत्तमळा, पाटीलडरा (मिनी), येळूशीवाडी, सावरचोळ–चंदनदरा, सांगवी बिरोबावस्ती, बेटवस्ती, श्रमिक नगर, जवळे कडलग बिरोबावस्ती, साबळेवस्ती, धांदरफळ बु.–डेरेवाडी, धांदरफळ बु.-२, कोकणेवाडी, पिंपळगाव कोझिरा–वाळुंजवस्ती, वडगाव लांडगा, बोऱ्हाडे मळा, कानवडे मळा, रायते–रायते फाटा, वाघापुर, देवगाव, कोटकरवस्ती, राजापूर–देशमुख खातोडे आखाडा, खंदक आखाडा, निमगाव भोजापूर, चिकणी–वर्षेवस्ती, कासारा दुमाला–सावंतवस्ती, मंगळापूर, चिखली–दत्तमळा, समनापूर, मानकुबाबा, सुकेवाडी, गणपतीमळा, कानिफनाथवस्ती, खांजापूर–अग्नेश्वर, वेल्हाळे, हरीबाबावस्ती आणि भांडमळा या अंगणवाड्यांचा स्मार्ट अंगणवाडी मध्ये समावेश करण्यात आला आहे.



